पुणे जिल्हा : बेल्ह्यात रंगला लोकनाट्य तमाशा, लावणी लोककला महोत्सव

राज्यभरातील रसिकांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद : यंदाचे 12वे वर्ष
बेल्हे : जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथे लोकनाट्य तमाशा व लावणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. हे 12 वे वर्षे असून, या महोत्सवास रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
श्री साईकृपा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दि. 27 ते 30 नोव्हेंबर दरम्यान चार दिवस बेल्हे लोकनाट्य तमाशा, लावणी लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. बेल्हे येथे आयोजित बेल्हे लोकनाट्य तमाशा महोत्सवाच्या तपपूर्ती सोहळ्यात, अनेक नामवंत लोकनाट्य तमाशा मंडळांनी तसेच लोककला संच यांनी सहभाग घेतला होता.
या लोकनाट्य तमाशा महोत्सवाला जुन्नरचे माजी आमदार अतुल बेनके, प्रसिद्ध सिनेअभिनेत्री वर्षा उसगावकर, प्रसिद्ध दिग्दर्शक-सिने अभिनेते प्रवीण तरडे, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, खजिनदार अनिल गुंजाळ, मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकॅडमीचे योगेश चिकटगावकर, पानिपतकार लेखक विश्वास पाटील आदीं हजेरी लावली. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी श्री साईकृपा चॅरिटेबल ट्रस्ट व श्री साईकृपा पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत जगताप, उपाध्यक्ष सदाशिव बोरचटे, सचिव सावकार पिंगट, संजय विश्वासराव, अनिल गुंजाळ – पाटील आदींसह श्री साईकृपा परिवारातील सर्व संचालक व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकॅडमीने कलाविष्कार सादर केला. तर या लोकनाट्य तमाशा महोत्सवाचे संयोजक वसंत जगताप यांनी स्वतः सवाल – जवाब कार्यक्रमात सहभाग घेत उत्कृष्ट गाणी गावून प्रेक्षकांचा उत्साह वाढवला. महादेव मनवेकर लोकनाट्य तमाशा, लंका जयसिंग पाचेगावकर लोकनाट्य तमाशा, छाया आगरकर नागजकर लोकनाट्य तमाशा, शकुंतला चव्हाण नगरकर लोकनाट्य तमाशा, ईश्वर बापू पिंपरीकर लोकनाट्य तमाशा, रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर लोकनाट्य तमाशा, कमल अनिता कराडकर लोकनाट्य तमाशा आदी तमाशे संपन्न झाले.
ज्येष्ठ तमाशा कलावंत कै. दत्ता महाडिक पुणेकर यांच्या स्मरणार्थ, बेल्हे येथे हा तमाशा महोत्सव गेली 12 वर्षे सुरू आहे. ग्रामीण भागातील लोककला टिकली पाहिजे यासाठीचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे. अनेक कलावंताचे रखडलेले मानधन शासनाकडून मिळवून देणार आहे.
– अतुल बेनके, माजी आमदार, जुन्नर
बेल्हे लोकनाट्य तमाशा महोत्सव हा उपक्रम सलग 12 वर्षे राबवणे सोपी गोष्ट नाही. तमाशा अस्सल रांगडी कला आहे. आजही काही ज्येष्ठ तमाशा कलावंत हलाखीचे जीवन जगतात, त्यांना सन्मानाचे जीवन जगता यायला हवे. सरकारची त्यांच्यावर मेहेरनजर असायला हवी.
– वर्षा उसगावकर, प्रसिद्ध सिनेअभिनेत्री
डोक्यावरची वारकरी टोपी ही महाराष्ट्राची ओळख असून, येणारा काळ शेतकर्यांचा असणार आहे. कला क्षेत्राची आवड असल्याने बेल्हे लोकनाट्य तमाशा महोत्सवाला येण्याचा योग आला. ही लोककला जिवंत ठेवण्यासाठी राबणार्या वसंत जगताप व त्यांच्या सहकार्यांचे मनापासून कौतुक आहे.
– प्रवीण तरडे, प्रसिद्ध दिग्दर्शक, सिने अभिनेते





