पुणे जिल्हा : पावसाने पाठ फिरवल्याने बळीराजा चिंतेत

– आंबेगावच्या पूर्व भागात दुबार पेरणीचे संकट
लोणी धामणी – मागील वर्षाच्या तुलनेत यंदा पावसाने सुरुवात चांगली केली. बऱ्याच वर्षांनी मृग नक्षत्रात पेरणी होण्याचा योग आला होता. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे.
पूर्व भागातील लोणी, धामणीसह पहाडदरा, वडगावपिर, मांदळेवाडी सहा गावे कायम दुष्काळग्रस्त म्हणून ओळखली जातात. या परिसरात पाण्याचे दुर्भिक्ष एवढे आहे की, फेब्रुवारी महिन्यानंतर टँकर सुरू करावे लागत आहेत.
शेतीसाठी पाण्याचा कुठलाच ठोस पर्याय नसल्याने येथील शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे येथील शेतकरी कायम अडचणीत सापडत आहे. या परिसरात प्रामुख्याने बाजरी,मका,सोयाबीन,कडधान्य तर शिरदाळे परिसरात बटाटा लागवड आणि इतर नगदी पिके यांची पेरणी करण्यात आली. परंतु गेल्या १५ दिवस पावसाने दडी मारल्याने पिके वाळू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाची अत्यंत गरज असून शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला आहे.
एक रुपयात सरकारी पीकविमा काढण्याचे काम प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर सुरू असून शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा आणि आपल्या पिकांचा पीकविमा काढावा, असे आवाहन यावेळी पूर्व भागातील सर्व सरपंचाच्या वतीने शेतकऱ्यांना करण्यात आले. तर काही मदत ग्रामपंचायत पातळीवर लागली तर ती शेतकऱ्यांना केली जाईल, असे शिरदाळेचे माजी उपसरपंच मयुर सरडे यांनी सांगितले.





