पुणे जिल्हा : शिरुर तालुक्यात सरासरी ५९.५ टक्के पाऊस

तीन दिवसांत दमदार हजेरी : न्हावरा गावामध्ये सर्वाधिक टक्का
शेरखान शेख
शिक्रापूर : गेली अनेक दिवस बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत असताना शिरुर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाण्याची समस्या बिकट होत असताना नुकतेच पावसाचे आगमन झाले. पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्ग आनंदित होऊन बळीराजा सुखावला आहे. शिरुर तालुक्यात तीन दिवसांत सरासरी ५९.५ टक्के पावसाची नोंद झाली आहे.
शिरुर तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतामध्ये अनेक पिके घेतलेली आहेत. पाण्याची टंचाई निर्माण झालेली असताना शेतातील विहिरी व विंधनविहिरींनी तळ गाठला होता. त्यामुळे सर्वच भागातील शेतकरी चिंतेत आले होते. मात्र शिरुर तालुक्यात नुकतेच पावसाने हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी शेतात पाणीच पाणी झाले आहे.
तालुक्यात सरासरी ५९.५ टक्के इतकी पावसाची नोंद झाली आहे. न्हावरा गावामध्ये तीन दिवसांत १३६.६ टक्के इतकी पावसाची नोंद झाली आहे. काही ठिकाणी ओढे, नाले देखील पाण्याने भरू लागले आहेत. काही ठिकाणी अक्षरशः तळ्याचे स्वरूप निर्माण झाले. पाण्याअभावी जळून चाललेल्या पिकांना जीवदान मिळालेच मात्र शेतकरी नवीन पिके पेतानीच्या तयारीला लागल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणात समाधान दिसून येत आहे.
खरिपासाठी फायदा
शेतातील पिके पाण्याअभावी जळून चाललेली असताना, शेतीची व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली होती. मात्र सध्या चांगला पाऊस झाल्याने पिकांना नवचैतन्य मिळणार असून पुढील पिकांना देखील फायदा होणार आहे. तसेच विहीरी व विंधनविहीरीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याचे निमगाव म्हाळुंगी येथील प्रगतशील शेतकरी हरिभाऊ भोरडे यांनी सांगितले.
वडगाव रासाईत सर्वाधिक नोंद
शिरुर तालुक्यातील गावनिहाय पावसाची सरासरी पुढीलप्रमाणे- शिरुर – ७४.५ टक्के (तीन दिवस) , टाकळी – १५.१ टक्के, वडगाव रासाई- ७७.८ टक्के, न्हावरा- १३६.६ टक्के, मलठण (२ दिवस) – २८.२ टक्के, तळेगाव ढमढेरे (२ दिवस) – ६२.४ टक्के, रांजणगाव गणपती (२ दिवस) – ४६.५ टक्के, कोरेगाव भिमा ( २दिवस ) – ६३.४ टक्के, पाबळ (१ दिवस) – ३०.६ टक्के.





