पुणे जिल्हा : निवडणुकांसाठी इच्छुकांची पुन्हा धावपळ

मतदारांना भेटण्याची लगीनघाई ; विविध कार्यक्रमांना पदाधिकाऱ्यांची हजेरी
राजकीय घडामोडींनाही आला वेग
विजय शिंदे
वडापुरी – सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे निवडणुकांची लगीनघाई पुन्हा एकदा सुरू झाली आहे. गेल्या पाच महिन्यांपासून निवडणुका कधी लागणार, याची प्रतीक्षा करत असलेल्या इंदापूर तालुक्यातील सर्वपक्षीय इच्छुक उमेदवारांनी पुन्हा एकदा बाशिंग बांधण्याची तयारी सुरू केली आहे.
निवडणूक कार्यक्रमाबाबत अनेकदा संभ्रम निर्माण झाल्याने घोड्यावर बसून अनेकदा खाली उतरावे लागलेल्या इच्छुकांनी पुन्हा आपला संपर्क वाढविण्यास सुरुवात केली असून, संभाव्य गट व गणात विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आपण इच्छुक असल्याचे दाखवून देत आहेत. त्यामुळे इंदापूर तालुक्यात आता राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे.
इंदापूर तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी पूर्वी 7 गट व 14 गण होते; परंतु आता 2 गट व 4 गण वाढणार असल्याने अनेक गावांची फेररचना झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे विद्यमान पदाधिकाऱ्यांमध्ये संभाव्य गट व गण रचना अधिकृत न झाल्याने संपर्क करताना संभ्रम निर्माण होत आहे.
दरम्यान, ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होण्याची चिन्हे असल्याने ओबीसीमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. इंदापूर तालुक्यातील काही राजकीय युवा नेत्यांनी निवडणुकांची तयारी म्हणून कुणबी (ओबीसी) दाखले तयार केले होते. आपल्या गटातील व गणातील जागा जर ओबीसीसाठी राखीव झाली तर त्यासाठी त्यांची लढण्याची तयारी होती; परंतु निवडणुका तात्काळ घेण्याचे आदेश दिल्याने त्यांची ही तयारी वाया गेल्याचे दिसून येत आहे.
आरक्षणाविनाच होणार निवडणुका?
इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) आरक्षणासाठी राज्य सरकारने ट्रिपल टेस्टच्या चाचणी अद्याप पालन न केल्याने या निवडणुका आरक्षणाविना होणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणासाठी पुढे ढकललेल्या निवडणूक कार्यक्रम लवकरच लागण्याच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत.
पश्चिम हवेलीत ‘याला गाड, त्याला गाड’
मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींसाठी वातावरण गरम
खडकवासला – सिंहगड परिसरातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका लवकरच होणार असल्याने गावाच्या सत्तेची चावी आपल्याकडेच हवी यासाठी गावात फोडाफोडीचे वातावरण पाहायला मिळत आहे. गावात माझीच सत्ता यावी यासाठी काय पण करण्याची तयारी असुन अनेक गावात याला गाड त्याला गाड ची भुमिका पहावयास मिळत आहे.
सिंहगड परिसरात मुदत संपलेल्या विविध ग्रामपंचायतीत सरपंच कोण होणार यांच्या पैजा लागल्या असून कोणाचा भाव वाढवायचा आणि कोणाचा कमी करायचा यातून विविध स्तरातून सुत्र हलविणारे गट जोरदार सक्रिय झाले आहेत. काहीनी तर देवदर्शन, सहलीचे आयोजनाची तयारी केली आहे. तर अनेकजण घरात बसून गोळाबेरीजेच्या राजकारणा बरोबरच विरोधी गळाला कसा लागेल यासाठी सापळा रचण्यात गुंग झाले आहेत.
व्यसन करून चौकात बसुन टिंगल टवाळ्या करून स्वत;चे नाव खराब केल्यापेक्षा गाव विकासाची कास हाती घेऊन गावाचा विकास करण्यासाठी गावाचा गाडा हाकण्याची जबाबदारी घ्यावी व नाव कमवावे. गावाचा गौरव करून निवडणुकीमध्ये सक्रिय सहभाग घेऊन आपले गुण दाखवून द्यावे तरच निवडणुकीचा उद्देश साध्य होईल, असे आवाहन खानापूरचे माजी सरपंच शरद जावळकर यांनी केले.
काही ग्रामपंचायती खूप चांगल्या प्रकारे काम करून स्वत:च्या गावाचे नाव लौकिकासोबत ग्रामविकास करून घेतात. त्या गावात गेल की विकास काय असतो याची प्रचिती येत असते. ग्रामपंचायत कीती खर्च करते. खर्च कोठे होतो ती जबाबदारी तरूण वर्गाची आहे. पण तरूण वर्ग पुढे येत नाही. आदर्श गाव कसे असते. आदर्श ग्रामपंचायत काय आसते गावातील लोकांना प्रवाहात आणून गावातील विकास कसा करायचा हे जुन्या माजी सरपंच यांनी तरूणांना गाव हिताचे काम करण्याची संधी द्यावी व गावात एकोपा निर्माण करावा.
– नवनाथ पारगे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य





