पुणे जिल्हा : आमचे प्रश्न सोडवा, नंतर मत मागा

इंदापूरकर घरोघरी लावणार फलक : शहरवासियांचा अभूतपूर्व निर्णय
इंदापूर : शहरामध्ये इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीच्या वतीने जे धरणे आंदोलन सुरू आहे.त्या आंदोलनाला एक वर्ष पूर्ण झाले त्यानंतर ही नगरपालिकेने सक्तीने वसुली सुरू केली. संघर्ष समितीली नगरपालिकेने लेखी दिले आहे की, पाणीपट्टी व घरपट्टीवरील व्याज जोपर्यंत शासनाकडे पाठवलेला प्रस्ताव मंजूर होत नाही, तोपर्यंत वसुल करणार नाही. त्यावर इंदापूरकर आक्रमक होऊन आधी आमचे प्रश्न सोडवा नंतर मत मागा असे बोर्ड इंदापुरातील प्रत्येक घरावर लावणार असल्याच निर्णय घेतला आहे.
इंदापूर शहरात वास्तव्य करणारे नागरिक शासनाच्या विरोधात आक्रमक झाले असून संघर्ष समितीने जे इंदापूर शहरातील जनतेचे प्रश्न मार्गी लावावेत यासाठी लढा उभारला आहे. त्यासंबंधित प्रश्नावर शासन व संबंधित उमेदवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही व इंदापूरकरांचा प्रश्न सोडवला नाही. तर निवडणुकीतील प्रचार काळादरम्यान इंदापूरकर आधी आमचे प्रश्न सोडवा नंतर मत मागा हा सवाल करण्याचा मनोदय शेकडो नागरिकांनी घेतलेला दिसतोय.
संघर्ष समितीचे प्रमुख प्रा. कृष्णाजी ताटे म्हणाले की, इंदापूर शहरवासीयांच्या प्रश्नांसाठी इंदापूर शहर संघर्ष समितीने सर्वच राजकीय पक्षांना सर्व राजकीय पुढार्यांना सर्व उमेदवारांना भेटली आहे व भेटणार आहे; परंतु प्रत्येक जण आपल्या छोट्या-छोट्या स्वार्थासाठी इंदापूरकरांच्या या प्रश्नाकडे लक्ष देत नाही. सर्व गोष्टी इंदापूरकरांवर बेकायदा लादलेल्या असताना राजकीय पक्षाचे पुढारी हे आश्वासन देतात. लवकरच आम्ही हे पूर्ण करू; परंतु नंतर दिलेल्या आश्वासनासंबंधी विचार करीत नाहीत. म्हणून इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीने आगळे वेगळे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.
मूलभूत 27 प्रश्न
प्रत्येक नागरिक स्वतःहून स्वतःच्या घरावर आधी इंदापूरकरांचे प्रश्न सोडवा नंतर मत मागा अशा प्रकारचे फलक प्रत्येक घरावर लावणार आहे. तरी या गोष्टीची तातडीने दखल घेऊन इंदापूरकरांचे मूलभूत व नागरी 27 प्रश्नावर नागरी संघर्ष समिती आंदोलन करीत आहे ते तातडीने सोडवावेत, असे आवाहन करण्यात येत आहे.





