Pune District : जंगलात सोडलेल्या जनावरांची अन्नपाण्याविना तडफड

– जनावरे सांभाळण्याची क्षमता नसल्याने गोऱ्हे सोडले गावाबाहेर रस्त्याच्या कडेला
लाखणगाव – अनेक शेतकरी नवीन जन्माला आलेले गोऱ्हे आडमार्गी रस्त्याच्या कडेला,जंगलात सोडून देत आहेत. परंतु ही वासरे अन्न पाण्याशिवाय ओरडून ओरडून आपला जीव सोडत आहेत.त्यामुळे माणूस किती स्वार्थी झाला आहे. हे दिसून येते. शासनाने गोहत्या बंदी कायदा केला. परंतु यावर उपाययोजना कुठल्याही प्रकारची केली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांकडे उत्पादन न देणारी ही जनावरे सांभाळण्यासाठी शासनाने पांजरपोळ गोशाळा सुरू करणे गरजेचे आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील पिंपळगाव, काठापूर बुद्रुक,लाखनगाव ,जारकरवाडी,देवगाव,पोंदेवाडी या परिसरात स्थानिक शेतकऱ्यांच्या पडीक क्षेत्रात लहान वासरे मोकाट स्वरूपात सोडली जात आहेत. खायला पुरेसे अन्न न मिळाल्याने या वासरांचा मृत्यू होत असून काही वासरे कुत्र्यांच्या भक्षस्थानी पडत आहेत. वासरे मृत्यू पावल्यानंतर त्यांची दुर्गंधी येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना व स्थानिकांना सहन करावी लागत आहे.
या प्रकाराला नक्की जबाबदार कोण हा प्रश्न उभा राहिला आहे.मोकाट सोडलेली वासरे मोकाट कुत्र्यांच्या भक्ष्यस्थानी पडत आहेत.मात्र शिल्लक राहिलेले वासरू कुत्र्यांनी न खाल्ल्याने त्याची मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटत आहे.त्याचा थेट परिणाम स्थानिकांच्या आरोग्यावरती होत आहे.तसेच मोकाट कुत्र्यांना खायला काहीही न मिळाल्यानंतर ते स्थानिक शेतकऱ्यांच्या वासरांवरती, शेळ्यांवरती हल्ला करत आहेत. आधीच या परिसरात बिबट्याचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य व वावर आहे. त्यात आलेले हे नवीन संकट या परिसरातील शेतकरी व स्थानिक रहिवासी यांच्या पुढे उभे आहे.याबाबत प्रशासनाने लवकरात लवकर तोडगा काढावा.
अशी मागणी सामाजिक शेतकरी व रहिवासी पुढे आली आहे.शेतकऱ्यांनी सांभाळण्यासाठी अवघड झालेली गाई,गोऱ्हे, वासरे गाभण, न राहणाऱ्या गाई, लहान जन्माला आलेले गोऱ्हे सांभाळण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था उभी केली पाहिजे.सध्या दुधाला बाजार भाव नाही. त्यामुळे शेतकरी आधीच वैतागला आहे. एकंदरीतच दुधाचे होणारे उत्पन्न यातून मिळणारे पैसे व या जनावरांवर येणारा खर्च पाहतात शेतकऱ्यांचे हाती काही लागत नसून अशा परिस्थितीत ही भाकड जनावरे सांभाळताना अधिक खर्च होत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी गोठे बंद करून गाया विकल्या आहेत. सध्या गायी विकण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
चांगली गायी सुद्धा अल्प किमतीला विकली जात आहे. शेतकरी गोठे मोकळे करत असल्याचे प्रमाण वाढले आहे.शासनाने गोहत्याबंदी कायदा करून नक्कीच गोवंशाचे संरक्षणाचे काम केले की गोवंश नष्ट करण्याकडे पाऊल उचलले हा प्रश्न उभा आहे.शासनाने केलेला हा कायदा नक्कीच कुठेतरी फसला असल्याचेही काही शेतकरी सांगत आहेत. एकंदरीतच शासनाने कायदा करत असताना गो हत्या बंदी कायदा केल्यावर निर्माण होणार्या प्रश्नांचा विचार करुन उपाययोजना करणे गरजेचे होते. परंतु असला कुठलाही मार्ग न काढता कायदा केला आणि त्यामुळे अनेक प्रश्न उभे राहीले आहेत.
वासरांचा प्रश्न अनुत्तरीतच
गावांमध्ये सध्या जर्शी गायींचे वासरे,गोऱ्हे अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला,ओढ्याच्या कडेला, वनविभागाच्या जागेत,सार्वजनिक गायरान जागेत अशा अनेक ठिकाणी सोडलेले पहावयास मिळत आहेत. या वासरांचा नवीन प्रश्न उभा राहिला असून अन्नपाण्याशिवाय ओरडणारी वासरे मन सुन्न करत असून याकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे.
जनावरानाच मागणीच नाही
चौकट:महाराष्ट्र शासनाने गोहत्या बंदी कायदा लागू केल्यापासून मोठ्या प्रमाणावर लहान वासरे, भाकड, गाई यांचा प्रश्न ग्रामीण भागातील शेतकऱ्र्यांपुढे उभा राहिला आहे.कायदा लागू झाल्यापासून भाकड जनावरांची मागणी पूर्णपणे थांबली आहे.यामुळे दुध न देणाऱ्या गाई त्याचप्रमाणे नवीन जन्माला आलेली वासरे,गोऱ्हे यांचं करायचं काय हा प्रश्न उभा राहिला आहे.





