पुणे जिल्हा : तरुणाच्या जीवावर बेतला व्यायाम

– दुर्दैवी घटनेमुळे भोलावडे गावांवर शोककळा
भोर – भोर-पुणे मार्गावरील हाॅटेल पद्मावतीजवळ व्यायाम करत असताना अजय काळू भोसले (वय २१, रा. भोलावडे ता.भोर) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.
भोर पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार संजय सुरेश भोसले याचा चुलत भाऊ अजय काळू भोसले हे दोघेजण भोलावडे येथील पद्मावती हॉटेल (कान्हेगुरुजी नगर) समोर थांबले होते. त्यावेळी अजय काळू भोसले याने तेथे सात ते आठ जोर मारले व थोडा व्यायाम केला.
त्यानंतर त्यास अचानक चक्कर आली व तो खाली बसला म्हणून त्यास काय झाले, असे विचारले असता तो काही झाले नाही, असे म्हणाला व त्यानंतर तो लगेचच खाली झोपला व बेशुद्ध पडला. काही एक हालचाल करीत नव्हता म्हणून त्याला लागलीच नातेवाईकांना कळवून जवळच असलेल्या एका खाजगी रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी त्यास तपासलेनंतर सरकारी दवाखाना भोर येथे घेऊन जाण्यास सांगितले.
त्यानंतर त्यास सरकारी दवाखाना भोर येथे आणले असता तेथील डॉक्टरांनी त्यास तपासून तो उपचारपूर्वी मयत झाल्याचे सांगितले आहे. पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार वर्षा भोसले पुढील तपास करीत आहे.





