पुणे जिल्हा : पालाखी मार्गाचे पर्यायी मार्ग अर्धवटच

त्रुटींवर दोन महिन्यापूर्वी केवळ चर्चाच : कामे जैसे थेच
वाल्हे – सुकलवाडी (ता. पुरंदर) फाट्याशेजारी प्रांगणामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा शुक्रवारी (दि. 5 जुलै) विसावणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पालखी सोहळा मुक्कामाची पूर्वतयारी म्हणून पालखी सोहळा कमिटीसह, पुरंदर प्रशासनाकडून वाल्हे येथील पालखीतळाची पहाणी एप्रिल महिन्यापासूनच सुरू करण्यात आली आहे. यावेळी ज्या त्रुटींबाबत चर्चा करण्यात आली त्या त्रुटी दोन महिन्यांनंतरही जैसे थेच आहे.
वाल्हे पालखी तळापासून पर्यायी रस्ता असलेल्या सुकलवाडी, झिरपवस्ती, गुळूंचे मार्गे नीरा. तसेच सुकलवाडी, मुकदमवाडी, अंबाजीवाडी, गायकवाडवाडी मार्गे राख या रस्त्यांच्या कामांसाठी ग्रामस्थांमधून वेळोवेळी मागणी होत होती. मागील वर्षी पालखी सोहळ्याच्या आगोदर, तात्कालिन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी येथील पालखी तळाला भेट दिली होती. यावेळी, ग्रामस्थांनी या पर्यायी रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी केली होती. त्याअनुषंगाने या पर्यायी रस्त्याचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र, दिलेल्या निधीत रस्ता अपुर्ण अवस्थेत राहिला होता.
दरम्यान, या रस्त्यांसाठी वाढीव निधीची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली होती. यानंतर, तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांनी येथील पालखी तळाला भेट देऊन, पाहणी केली. दरम्यान, यावेळी पालखी सोहळा कमिटीनेही पर्यायी मार्गावरील दोन्ही रस्त्यांसाठी दिलेला निधी कमी पडत असून तात्काळ निधी उपलब्ध करून देण्याची मागणी पालखी सोहळा कमिटीसह, ग्रामस्थांनी महसूल मंत्र्यांना केली होती.
तत्कालीन महसूलमंत्र्यांचे आश्वासन हवेतच
तात्कालिन महसूल मंत्र्यानी देखील संबंधित अधिकारीवर्गाला निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच कोणत्याही परिस्थितीत पालखी काळात वैष्णवांची गैरसोय होणार नाही, अशी काळजी घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, तब्बल वर्षांपासून पालखी सोहळ्यातील पर्यायी मार्ग, अर्धवट कामाच्या अवस्थेतच आहेत. यावर्षी तरी या पर्यायी अर्धवट अवस्थेत असलेल्या मार्ग पूर्ण होतील की नाही? असा प्रश्न येथील ग्रामस्थांमधून होत आहे.
यावर चर्चा
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्या दरम्यान वाल्हे येथील पालखीतळावर भाविकांसाठी दर्शनबारी, दिंड्या, बाहेर जाण्याचा मार्ग, रांगेतील दर्शन व्यवस्था, पालखी रथ येण्याचे मुख्य ठिकाण, बैठक व्यवस्था, नीरा स्नान, वाल्हे पालखी तळापासून जाणारा पर्यायी मार्ग आदींची पाहणी करून यावेळी आढळलेल्या त्रुटींबाबत चर्चा करण्यात आली होती. मात्र, तब्बल दोन महिन्यांनंतरही सर्व परिस्थितीती जैसे थेच आहे.





