Pune District: आलेगाव- चौफुला रस्ता सुसाट होणार

मलठण : दौंड तालुक्यातील पुर्व भागातील गावांसाठी दळणवळणासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या आलेगाव – बोरीबेल – काळेवाडी चौफुला रस्त्याचे काम सुरू झाले आहे. आमदार राहूल कुल यांच्या माध्यमातून रस्त्यासाठी १० कोटी रुपये निधी मंजूर केला आहे.
आलेगाव, बोरीबेल, काळेवाडी, काळेवाडी चौफुला ही गावे येतात. परिसरातील ग्रामस्थांना विविध कामांसाठी दौंडला येण्या-जाण्यासाठी याचा वापर करावा लागतो. ६ ते ७ किलोमीटर असणारा हा रस्ता सद्या अरूंद असल्यामुळे उसाची वाहतूक करताना तसेच इतर वाहनांना प्रवास करताना अडचण येत होती. रस्त्यावरील सर्व पुलही अरुंद आहेत. त्यामुळे रुंदीकरण व मजबूतीकरण करण्याची मागणी नागरिक अनेक दिवसांपासून करीत होते. आमदार कुल यांच्याकडे परिसरातील ग्रामस्थ व पदाधिकारी यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा केला होता. रस्त्याचे काम सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
स्थानिक शेतकरी, विद्यार्थी, प्रवासी, वाहतुकदारांची अडचण लक्षात घेता आमदार कुल यांच्याकडे सातत्याने रस्त्यासाठी पाठपुरावा केला होता. हा रस्ता मंजुर झाल्यामुळे परिसरातील दळणवळणासाठी मोठा फायदा होणार असून परिसराच्या विकासासाठी हातभार लागणार आहे.
– गणेश गायकवाड, माजी सदस्य, ग्रामपंचायत हिंगणीबेर्डी, काळेवाडी.सद्यस्थितीत आलेगाव- बोरिबल- काळेवाडी हा अस्तित्वातील रस्ता अरुंद असल्याने वाहतुकीसाठी अपुरा पडत होता. त्यामुळे रुंदीकरण्याचे काम अर्थसंकल्प अंतर्गत प्रस्तावित केले आहे. त्या अनुषंगाने कामास दहा कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे. नुकतेच काम सुरू झाले आहे.
– शशिकांत तुपे, शाखा अभियंता, बांधकाम उपविभाग, दौंड.





