पुणे जिल्हा : शब्दाचा पक्का, हाच अजितदादाचा वादा

इंदापूरच्या दुष्काळी 22 गावांच्या पाणीप्रश्नासाठी नवीन जलव्यवस्था प्रणाली
इंदापूर – घड्याळाला मत म्हणजे राज्यातील सर्वांगीण विकासाला मत, माझ्या महिलांना संरक्षण देण्यासाठी मत, सक्षमीकरणासाठी मत, तिला सबल करण्यासाठी मत, त्यामुळे तुमच्या प्रगतीसाठी आमदार दत्तात्रय भरणे यांना भरघोस मतदान करा, मी शब्दाचा पक्का आहे, हाच अजितदादाचा वादा आहे. कोणत्याही परिस्थितीत आमदार दत्तात्रय भरणे यांना तिसर्यांदा महाराष्ट्राच्या विधानसभेत माझ्याबरोबर पाठवा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
इंदापूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार दत्तात्रय भरणे प्रचारार्थ सोमवारी (दि. 18) इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणावर आयोजित केलेल्या सांगता सभेत अजित पवार बोलत होते. यावेळी उमेदवार आमदार दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. शशिकांत तरंगे, जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, यांच्यासह शिवसेना, भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, राज्यात महायुतीला पोषक वातावरण आहे. इंदापूर तालुक्यातील आंबेडकरी वादी विचाराचा तसेच प्रत्येक कार्यकर्त्याचा मानसन्मान ठेवण्याचे काम आमदार दत्तात्रय भरणे ठेवतील. राहिलेल्या दोन दिवसांत कोणाचा कुठेही अपमान होऊ देऊ नका, कोणताही समाज दुखवू नका, घटक दुखवू नका. आमदार दत्तात्रय भरणे यांना मत देताना गावातल्या तालुक्यातील पुढार्यांची नाराजी मतात काढू नका. अशा सूचना कार्यकर्ते पदाधिकारी यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.
लाखेवाडी, रेडा, रेडणी, काटी, वरकुटे, निमगाव केतकी, शेवगाव यांच्यासारख्या दुष्काळी 22 गावांसाठी पिण्याच्या व सिंचनाच्या पाणी प्रश्नावर मात करण्यासाठी नवीन जलव्यवस्था प्रणाली व उजनी धरणातून पाणी आणण्यासाठी तलावासह कालव्यांची सोय प्रवाहात आणून त्यांना वेगळ्या प्रकारची बॅरिकेटची सोय करण्याचा आमचा वादा आहे. असा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.
आमचा वादा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूर तालुक्यात आगामी काळात काय करणार याबद्दल बोलताना सांगितले की, वालचंदनगरमध्ये अत्याधुनिक सुविधा असलेले रुग्णालय उभारले जाईल. अस्तित्वातील आरोग्य केंद्रांचा पुनर्विकास नव्या सुविधा देण्यात येतील. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी पंचायत समिती स्तरावर ग्रंथालय आणि शासकीय शाळांचे अद्यावत बांधकाम. विद्यार्थ्यांना पोषण युक्त आहार, छोटे बस स्टॉप, शेतकर्यांना नियमित वीजपुरवठा करण्याकरता नवीन विद्युत केंद्राची स्थापना. जैविक शेतीसह आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी शिबिरांची आयोजन करून, शेतकर्यांचे पिक साठवण्यासाठी कोल्ड स्टोरेज तालुक्यातील शेतकर्यांसाठी कष्टकर्यांसाठी केले जाईल, युवा वर्गाचा विकास साधण्यासाठी एमआयडीसीमध्ये स्थानिक लोकांना प्राधान्य देण्याचा, खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा हा प्रयत्न इंदापूर तालुक्यातील जनतेसाठी केला जाईल.
चुकीच्या मेसेजवर विश्वास ठेवू नका – भरणे
इंदापूर तालुक्यात हिंदू मुस्लिम ऐक्य प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे; मात्र विरोधक मतांसाठी चुकीचा मेसेज मुस्लिम बांधवांकडे, हिंदू बांधवांकडे फिरवतील, मतांसाठी राजकारण करतील यांना जाब विचारा, मागासवर्गीय व मुस्लिम बांधवांसाठी, वीस वर्षात या विरोधकांनी काय केले, त्यावेळेस दूध का दूध आणि पाणी का पाणी कळेल. यांच्या राजकारणासाठी माझ्या वाटेत काचा – काटे टाकले जातात. आरोप केले जातात याला उत्तर म्हणून मतदारांनी घड्याळासमोरील बटन दाबून विरोधकांना कायमची जागा दाखवावी. असे आवाहन, उमेदवार आमदार दत्तात्रय भरणे यांनी केले.





