पुणे जिल्हा : सरसकट आरक्षणाचा सरकारबरोबर करार

भोरमधील सभेत जरांगे पाटील यांची माहिती : 24 डिसेंबरला गुलाल उधळणार
भोर – राज्य सरकारबरोबर सकल मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याचा करार झाला असून, शासनाने कुणबी शेतकऱ्यांच्या नोंदी शोधण्याचे काम सुरू केले आहे. राज्यात 29 लाख नोंदी समोर आल्या असल्याने सत्तेत असणाऱ्या स्वार्थी लोकांना आता संताजी-धनाजी दिसू लागले आहेत. त्यामुळे सत्तेत असलेले लोक ओबिसी आणि मराठे यांच्यात जातीय वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत; पण 24 डिसेंबरपर्यंत गावोगांवी साखळी उपोषण सुरू ठेवा, 24 डिसेंबरला सरसकट आरक्षणाचा गुलाल मराठे उधळणार आहेत, असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी भोर येथील आयोजित सभेत बोलताना व्यक्त केला.
यावेळी भोर, वेल्हा, शिरवळ, खंडाळा, हवेली, पुणे येथील सकल मराठा समाजाचे सुमारे 12 हजार महिला-पुरुष उपस्थित होते. यावेळी जरांगे पाटील यांनी भोर चौपाटी येथील छत्रपती शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पमालिका अर्पण करून आभिवादन केले. यावेळी सकल मराठा समाजातर्फे जरांगे पाटलांना संजय भेलके यांच्या हस्ते वाघनखे आणि शिवरायांची प्रतिमा भेट देऊन सन्मानित करण्यात आले.
ते म्हणाले, मराठा समाजाने कोणाच्याही आरक्षणाला विरोध केला नाही. गेली 70 वर्षे आरक्षणापासून आम्ही वंचित असुन उच्च शिक्षण घेऊनही नोकऱ्या मिळत नसल्याने अनेकांनी आत्माहत्या केल्या आहेत. सरकारमधील सत्ताधारी मंत्रिपदाची आब न राखता जातीय वादाचे षड्यंत्र रचतो. त्यांना मराठ्यांना आरक्षण मिळवून द्यायचे नाही, असा टोला लगावून छगन भुजळ यांच्या विचारांना आजपर्यंत विरोध होता. मात्र आता त्यांना व्यक्तिगत विरोध असून 24 डिसेंबर नंतर सोडाणार नाही, असा इशारा देत छगान भुजबाळांवर त्यांनी टीका केली.
यावेळी मराठ्यांना आरक्षण मिळावे, तालुक्यातील प्रत्येक मराठा बांधवांसाठी कुणबी प्रमाणपत्र, प्रत्येक गावात सकल मराठा समाजाच्या शाखा स्थापन करण्यात याव्यात, अशी मागणी भोर मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटलांकडे केली. शिवव्याख्याते निलेश जगताप आणि प्राचार्य प्रदीप सोळंके यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन विठ्ठल दानवले व प्रा. डॉ. संजय देवकर यांनी केले.





