पुणे जिल्हा : अणे पठारवासीय आक्रमक ; उपसासिंचन योजनेसाठी आमरण उपोषण सुरू

बेल्हे : अणे (ता. जुन्नर) पठारावरील आनंदवाडी, अणे, नळवणे, शिंदेवाडी, पेमदरा या गावांचा कुकडी प्रकल्पात समावेश करून उपसिंचन योजना रावबावी या मागणीकरिता गुरुवारी (दि. 23) पासून अणेचे पठार विकास संस्था कार्याध्यक्ष मधुकर दाते व संचालक मुक्ताभाऊ दाते यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
या आंदोलनास शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हा संघटक अंबादास हांडे यांनी पाठिंबा जाहीर करत उपस्थितांना मार्गदर्शन केले. जर पठार भागावरील आंदोलकांना जलसंपदा खात्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर शेतकरी संघटनेच्या वतीने कुकडीचे आवर्तनाचे थेंबभर सुद्धा पाणी धरणातून खाली जाऊ दिले जाणार नाही, प्रसंगी आम्ही शेतकरी कालव्यामध्ये आंदोलन करू, असा इशारा अंबादास हांडे यांनी दिला. त्यांच्या समवेत प्रमोद खांडगे तसेच भारतीय किसान संघाचे जुन्नर तालुकाध्यक्ष बाळासाहेब दाते आंदोलनस्थळी उपस्थित होते.
या उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका प्रियंका शेळके, शिंदेवाडीचे सरपंच अजित शिंदे, नळवणेच्या सरपंच अर्चना उबाळे, अणेच्या सरपंच प्रियंका दाते, पेमदराच्या सरपंच जयश्री गाडेकर, माजी सरपंच एम. डी. पाटील शिंदे, योगेश आहेर, शांताराम दाते, प्रकाश ताजवे, पांडुशेठ गाडेकर, पाटीलबुवा गाडेकर, रंगनाथ बेलकर, अरुणा दाते, रंगनाथ आहेर,
किशोर आहेर, सुहास आहेर, खंडुशेठ बेलकर, लक्ष्मण शिंदे, विठ्ठल बेलकर, आनंदा बेलकर, बाबाजी शिंदे, अनिल आहेर, प्रशांत दाते, सुनील दाते, बाबाजी आहेर, बाबुराव दाते, प्रकाश दाते, गोरख शिंदे, कान्हु हांडे, गणेश देशमुख, भरत पंडीत, संभाजी आहेर आदी मान्यवर उपस्थित होते. आंदोलकांच्या वतीने पठार विकास संस्थेचे अध्यक्ष संतोष शिंदे यांनी जाहीर पाठिंबा दिलेल्या व्यक्ती व संस्थांचे आभार मानले.
शेतकऱ्यांनी गुरुवारी (दि. 16) पासून रविवार (दि. 19) पर्यंत आंदोलन सुरू केले आहे. तर सोमवार (दि. 20) ते बुधवार (दि. 22) पर्यंत साखळी उपोषण करण्यात आले. एवढ्यावर शासनाने आंदोलनाची दखल न घेतल्याने गुरुवार (दि. 23) पासून मागणी पूर्ण होईपर्यंत आमरण उपोषण करण्यात येणार आहे.
विराज शिंदे, सचिव, पठार विकास संस्था, अणे.





