Pune District: लाचखोर अधिकाऱ्यावरील कारवाईचे स्वागत

बारामती : बारामती नगरपालिकेचे नगररचनाकार विकास ढेकळे यांना एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले असून या केलेल्या प्रशासकीय कारवाईचे क्रेडाई या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेने समर्थन केल्याचे प्रसिद्धी पत्रक संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे.
(दि.19) मार्च रोजी क्रेडाई बारामतीचे सदस्य भगवान चौधरी यांच्या तक्रारीवरून बारामती नगरपालिकेचे नगररचनाकार विकास ढेकळे यांच्यावर लाच लुचपत विभागाने कारवाई केली आहे. चौधर यांना नगररचनाकाराने बांधकाम परवानगी देण्यासंबंधी पैशाची मागणी केली होती. बारामती नगरपरिषदेस मिळणाऱ्या महसुलापैकी मोठा वाटा हा बांधकाम परवानगीच्या माध्यमातून जमा होत असतो. बारामती शहराच्या विकासामध्ये बारामतीतील बांधकाम व्यावसायिकांचा मोलाचा वाटा आहे.
या संदर्भाने क्रेडाई म्हणून आम्ही निवेदनात नमूद करतो की, बारामती नगरपरिषदेतील नगररचना विभागातील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा प्रचंड त्रास बारामतीमधील सर्व बांधकाम व्यावसायिकांना मागील काही वर्षापासून होत आहे.
वरिष्ठ अधिकारी सुद्धा याकडे कानाडोळा करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन भविष्यात कार्य तत्परता व कार्यक्षमता वाढवावी, असे प्रसिद्धीपत्रक क्रेडाईचे अध्यक्ष राहुल खटमोडे व सचिव अमोल कावळे यांनी प्रसिद्ध केले आहे.





