पुणे जिल्हा : झारगडवाडीत गारठ्याने दुभत्या गायीचा मृत्यू

शेतकऱ्याला फटका ; मदत देण्याची शेतकऱ्याकडून मागणी
डोर्लेवाडी – बारामती तालुक्यात थंडीचा जोर जास्त वाढल्याने जनावरांना देखील थंडीचा फटका बसत आहे. झारगडवाडी येथील शेतकरी गोपीनाथ धनाजी बोरकर यांची दीड महिन्यापूर्वी विलेली गायीचा मृत्यू झाला.
सोमवारी (दि.२५) रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. थंडीचा जोर जास्त असल्याने नेहमीप्रमाणे रात्रीच्या वेळी गायी गोठ्यात बांधली होती. गाईच्या मालकाने सायंकाळी नऊ वाजता गाईला चारा टाकला होता. त्यानंतर साडे अकराच्या सुमारास गाई ओरडल्याचा आवाज आल्याने गाई मालक बाहेर आला.
त्यावेळी गोठ्यात पाहिले असता गाईने अंग टाकून दिल्याचे दिसून आले. गायीला उठवण्याचा प्रयत्न केला. परंतु गायी उठली नाही. त्यातच गायीने प्राण सोडला होता. वीस लिटर दूध देणारी तिसऱ्या वेताची ही गाय होती. दीड महिन्यांपूर्वी गाई वेलेली होती. यात शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे. बारामती महसूल विभाग व पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून तातडीने नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
शेतकरी गोपीनाथ बोरकर म्हणाले की, झारगडवाडी परिसरात मोठ्या प्रमाणामध्ये थंडीचा जोर आहे. सोमवारी रात्री गायीला ह्रदयविकाराचा झटका आला असावा, असा माझा अंदाज आहे. कारण मोठ्या प्रमाणात धडपड करत होती. दीड महिन्यापूर्वीच गाय वेली होती. वीस लिटर दूध देणारी गाय होती. अगोदरच दुधाचे भाव पडले आहेत. त्यातच आता चाळीस हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. महसूल विभागाच्या माध्यमातून पंचनामा झालेला आहे. पशुसंवर्धन विभागाच्या डॉक्टरांकडून देखील शवविच्छेदन केले आहे. मात्र, आता तातडीने प्रशासकीय यंत्रणेकडून आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.





