Pune District : तुकोबांच्या पालखीचे जंगी स्वागत

पालखी सोहळा यवतमध्ये विसावला : दौंड तालुका भक्तिरसात चिंब
मनोज खंडाळे
यवत – गळ्यात तुळशीच्या माळ घालून, हातात भगवा पताका घेऊन, कपाळी केशरी गंध लावून अखंड माऊली तुकोबाचा जयघोष करत वैष्णवांचा मेळा हा सोमवार (दि. २३) सायंकाळी साडेचार वाजता दौंड तालुक्याच्या सीमेवर पोहोचला. वैष्णवांचे आदरातिथ्य करण्यात संबंध दौंड तालुक्याचे राजकीय पुढारी, सर्व शासकीय विभागाचे अधिकारी यांनी मनोभावे स्वागत केले. यवत येथे कालभैरवनाथ मंदिरात जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मुक्कामी विसावला.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा हवेली तालुक्यातील लोणीकाळभोर येथील मुक्काम करून सायंकाळी साडेचारच्या सुमारास सोलापूर महामार्गवरील पालखी मार्गातील सर्वात मोठा ३१ किलोमीटरचा सर्वात मोठा पल्ला पार दौंड तालुक्यात प्रवेश केला. यावेळी ज्ञानोबा तुकाराम यांच्या जयघोषाने दौंड तालुका भक्तीरसात डुबून गेला. दौंड तालुक्यातील नागरिकांनी, बोरिभडक ग्रामपंचायतीच्या वतीने फुलांचा वर्षाव, रांगोळीच्या पायघड्या घालून सर्व वैष्णवांचे मनोभावे स्वागत केले.
यावेळी पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी खासदार सुप्रिया सुळे, दौंडचे आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात, माजी आमदार रंजना कुल, भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्ष कांचन कुल, पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अप्पर पोलीस अधिकारी, पोलीस उपविभागीय अधिकारी बापूराव दडस, तहसीलदार अरुण शेलार, प्रभारी गटविकास अधिकारी महेश डोके, तालुका आरोग्य अधिकारी उज्वला जाधव, महावितरणचे अधिकारी आल्हाट, माजी उपसभापती नितीन दोरगे, युवा नेते गणेश थोरात, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार, काँग्रेसचे विठ्ठल दोरगे, ग्रामस्थ यांसह तालुक्यातील पदाधिकारी, कर्मचारी व यवत पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी व्यावसायिक,उद्योजक यांच्यातर्फे पालखीसोबत वारकरी, भाविकांना जेवण, फराळ, चहा, केळी, बिस्कीटाचे वाटप केले. यावेळी विविध सामाजिक संघटना, संस्था, उद्योजक, कार्यकर्ते यांच्याकडून पालखी सोहळ्यावर फुलांचा वर्षाव करीत जंगी स्वागत करण्यात आले. पालखी पुढे अश्वाचे दर्शन घेऊन रथातील पादुकांचे दर्शन लाभल्याचे वारकरी मनोमन तृप्त झाले. भक्तिमय वातावरणात वारकरी टाळ मृदुंगाच्या ठेक्यावर, अभंगांच्या ओव्यांवर धुंद होऊन नाचत होते.
यवत ग्रामस्थ व संयोजकांच्या वतीने सकाळपासून पालखीचा सोबत असणाऱ्या वारकऱ्यांच्या जेवणासाठी भाकरी बेसन त्यांची व्यवस्था केलेली असते.यवत याठिकाणी काळभैरवनाथ मंदिरात पालखी मुक्कामी असते.त्यावेळी उपस्थित यांच्यावतीने पालखीचे स्वागत करण्यात आले.रात्री ९. वाजता आरती झाली.रात्री जागर व कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. आकर्षक विद्युत रोषणाई, चोख पोलिस बंदोबस्त, मोबाईल चार्जिंग पॉईंट, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था,आंघोळीचा पाण्याची व्यवस्था, इत्यादी सर्व व्यवस्था केलेल्या असून वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची पुरेपूर दक्षता प्रशासनाकडून घेण्यात आली आहे.
पिठलं भाकरीची परंपरा कायम …
यवत ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी मिळून जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या वारकऱ्यांच्या जेवणासाठी १ हजार किलोचे पिठलं आणि एक लाखाच्या आसपास भाकरीचा बेत केला जातो. यावेळी यवतमाधील प्रत्येक नागरिक आपल्या इच्छेने भाजी आणि भाकरी या वारकऱ्यांसाठी श्री काळभैरवनाथ मंदिरात आणून देत असतात. ही वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा आजही यवतकर जोपसतात. वैष्णवांचे सन्मानपूर्वक आदरांतिथ्य करतात.
मुस्लीम कुटुंबाकडून अखंड सेवा
यवत येथील सलीम शेख, अबरार शेख हे कुटुंब दरवर्षी पालखी सोहळ्यास जेवण देत असते, ही परंपरा शेख यांच्या वडिलांनी यापूर्वी १० भाकरीपासून सुरू केली. आज सर्व कुटुंब अनेक वर्ष अविरत पालखीसाठी आणि वैष्णवासाठी जेवणाची परंपरा कायम चालू ठेवली आहे.





