मंचर – कळंब (ता. आंबेगाव) येथे बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला आहे, अशी माहिती वनविभागाच्या वतीने देण्यात आली. कळंब चांडोली रस्त्यावरील पाॅवर हाऊसजवळ वनविभागाने लावलेला पिंजरा आठवडाभर ठेवावा, जेणेकरून तीनही बिबटे त्यामध्ये जेरबंद होतील, त्यामुळे या रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची बिबट्याच्या भीतीतून सुटका होईल, असे मत ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. ग्रामस्थ आणि नागरिकांच्या मागणीनुसार त्यांच्या सुरक्षेच्या हेतूने हे ठिकाणी पिंजरा लावण्यात आलेला आहे, असे सरपंच उषा सचिन कानडे यांनी सांगितले आहे. अजूनही तीनही बिबटे मोकाट असल्यामुळे वस्तीवरील नागरिकांमध्ये व रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दोन दिवसांपूर्वी वनविभागाने लावलेल्या पिंज-यात बिबट्या जेरबंद झाला असला तरी अजूनही बिबट्याची दहशत असल्याचे सांगण्यात आले.