चाकण : विधानसभा निवडणुकीनंतर खेड तालुक्यात पहिल्यांदा सहकारतील सार्वत्रिक निवडणूक होत आहे. राजकीयदृष्ट्या संवेदनशील, महत्त्वाची मानली जाणारी खेड तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या 18 जागांसाठी अर्ज दाखल करण्याच्या मंगळवारी (दि. 11) शेवटच्या दिवसापर्यंत 59 अर्ज प्राप्त झाले आहेत, निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद राऊत यांनी दिली. दरम्यान, बुधवारी (दि. 12) अर्जाच्या छाननीत कोणाचा पत्ता कट होणार आणि गुरुवार (दि. 13) ते गुरुवार (दि. 27) या कालावधीत किती जण अर्ज माघारी घेणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे. निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांना शुक्रवारी (दि. 28) चिन्ह वाटप होणार आहे. त्यानंतर मतदान दि. 9 मार्च 2025 रोजी सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत होणार आहे. मतदानानंतर लगेच अर्ध्या तासाने मतमोजणीला सुरुवात केली जाणार आहे. तर मतमोजणी पूर्ण होताच निकाल जाहीर करण्यात येणार आहे. खेड तालुका खरेदी विक्री संघाचे निवडणुकीसाठी एकूण 15 मतदारसंघ असून त्यातून 18 संचालक निवडले जाणार आहेत. निवडणुकीसाठी एकूण मतदार संख्या 474 आहे. खेड तालुक्यात 102 विकास सोसायट्याचे आठ मतदारसंघ असून त्यामध्ये चाकण गट, वाफगाव गट, आळंदी गट, खेड गट, चास गट, वाडा गट, कडूस गट, महाळुंगे गट या आठ गटांतून एक या प्रमाणे 8 संचालक निवडून जाणार आहे. तर व्यक्तिगट मतदारसंघातून तीन संचालक व महिला प्रतिनिधी (राखीव) या मतदारसंघातून दोन संचालक आणि अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय (ओबीसी), भटक्या विमुक्त जाती जमाती व विशेष मागास प्रवर्ग, बिगरशेती सोसायटी प्रोसिसिंग कंजूमर्स संस्था या पाच मतदारसंघातून प्रत्येकी एक संचालक या प्रमाणे 18 संचालक निवडले जाणार आहेत. विशेष म्हणजे प्रोसेसिंग या मतदारसंघात फक्त एकच मतदार संख्या आहे आणि कित्येक वर्षे एकच व्यक्ती या मतदारसंघातून संघावर कायम निवडून जाते. खेड तालुका खरेदी-विक्री संघावर अनेक वर्षे सातकर गटाचे वर्चस्व आहे. निवडणूक प्रचंड गाजण्याची शक्यता विधानसभा निवडणूक लागण्यापूर्वी तत्कालीन आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी खरेदी-विक्री संघातील भ्रष्टाचार बाहेर काढण्याबाबत जाहीर सभेत व्यक्तव्य केले होते. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोहितेंना पराभवाचा सामना करावा लागला. आता संघाची पंचवार्षिक निवडणूक लागली असून मोहिते पाटील यांच्यासह सातकर गट व आमदार बाबाजी काळे काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर तालुक्यात पहिल्यांदा सहकारतील सार्वत्रिक निवडणूक होत आहे. अनेक इच्छुक उमेदवारांनी महिन्यापासून मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. एक मात्र खरे आहे ही संघाची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी असून निवडणूक प्रचंड गाजण्याची शक्यता वर्तविली जात आहे.