पुणे जिल्हा : खेडध्ये लोकसहभागातून 500 वनराई बंधारे बांधणार

राजगुरूनगर –खेड प्रशासन व लोक सभागातून खेड तालुक्याच्या दुष्काळग्रस्त भागात 500 वनराई बंधारे बांधण्याचा खेड महसूल विभागाने संकल्प केला असल्याची माहिती तहसीलदार प्रशांत बेडसे, नायब तहसीलदार राम बीजे यांनी दिली.
खेड तालुक्यात अनेक भागात उन्ह्याळ्याची चाहूल लागताच पाणी टंचाई निर्माण होते. तालुक्याच्या पूर्व भागात मोठी पाणीटंचाई भासते. पूर्व भागात मान्सून पाऊस कमी प्रमाणात पडतो पश्चिम भागात मुसळधार पाऊस पडतो मात्र पाणी साठवण्याची सोय नसल्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. तालुक्यात तीन धरणे असूनही तालुक्याचा पश्चिम भाग व पूर्व भाग वर्षानुवर्षे तहानलेला आहे.
खेड तालुक्यात पावसाळ्यात मान्सून पवासामुळे तालुक्यात अनेक नदी नाले वाहू लागले आहेत वाहणारे पाणी आपल्या शिवारात अडवले तर भविष्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही व रब्बी पिकांसाठी संरक्षित पाणी उपलब्ध होईल या हेतून खेड तालुक्यात प्रशासनाच्या वतीने लोकसहभागातून सुमारे 500 वनराई बंधारे बांधण्याचे नियोजन वनपरिमंडळ वन विभाग, गटविकास अधिकारी,तालुका कृषी अधिकारी, महसूल विभाग, यांचे वतीने करण्यात आले आहे.
यावर्षी पावसाचे प्रमाण कमी आहे पुढील महिनाभर गावातील परिसरात वनराई बंधारे बांधण्यासाठी उपयुक्त वेळ आहे. या वेळेत वनराई बंधारे बांधल्यास त्यात पाणी साचून पाणी पातळीत वाढ होण्यास मदत होईल, शासकीय यंत्रणा, गाव स्तरावरील यंत्रणा, लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना, स्वयंसेवी संघटना यांच्या पुढाकारातून जलसंवर्धन चळवळीला योगदान दिले
जाणार आहे.
असे आहे नियोजन
वनविभागाच्या माध्यमातून 250, खेड पंचायत समितीच्या माध्यमातून 150, महसूल विभागाच्या वतीने 100, कृषी विभागाच्या वतीने 100 असे एकूण 500 वनराई बंधारे बांधण्याचे नियोजन आहे. या उपक्रमात ग्रामस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन तहसीलदार बेडसे यांनी केले आहे.





