पुणे जिल्हा : जुन्नरमध्ये 50 बारवा पुनर्जीवित

दुर्लक्षित ऐतिहासिक जलसाठे सुमारे 100, 200 वर्षांपूर्वीचे
धामणखेल (ता. जुन्नर) :खंडोबा डोंगर येथील पुष्करणी.
सुलतानपूर (ता. जुन्नर) :अतकरी मळा बारव.
जुन्नर – जुन्नर तालुक्याला लाभलेल्या प्रगल्भ ऐतिहासिक वारसेतील काही वास्तू नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. सह्याद्रीच्या डोंगररांगा, वाड्या-वस्त्या तसेच ओसाड माळरानावर दुर्लक्षित असलेले जलसाठे जगासमोर आणण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. माजी सैनिक असलेले रमेश खरमाळे यांनी गावकऱ्यांच्या मदतीने 50 बारवा व विहिरी, 5 पुष्करणी आणि 21 डोंगर कातळात खोदलेल्या 31 शिवकालीन टाक्यांना पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न केला आहे.
जुन्नर तालुक्यातील विविध भागांत असलेल्या मात्र सर्वसामान्यांच्या विस्मृतीत गेलेल्या बारवांची स्वच्छता मोहीम आता जोमाने सुरू झाली आहे. या उपक्रमाला स्थानिक ग्रामस्थ तसेच निसर्गप्रेमी युवक साथ देण्यासाठी पुढे येत आहेत. जुने दगडी बांधकाम असलेल्या या बारवांच्या परिसरात वाढलेली झाडे-झुडपे तसेच त्यातील गाळ काढल्यामुळे बारवा आता मोकळा श्वास घेत आहेत.
एकेकाळी परिसरातील नागरिकांची तहान भागवणाऱ्या बारवांकडे नवी पिढी कुतूहलाने पाहत आहे. यातील बहुतांश बारव या मंदिर परिसरात असून अनेक बारवांची स्वच्छता पूर्ण झाल्याचे खरमाळे सांगतात. दरम्यान ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या बारवांचे संवर्धन व स्वच्छता होणे गरजेचे असून काळाच्या ओघात अनेक बारवा या जमिनीत गाडल्या गेल्या आहेत.
या ठिकाणी शिवकालीन टाक्या
जुन्नर तालुक्यात 7 किल्ले व 16 लेण्यांच्या परिसरात हजारो वर्षांपूर्वी कोरलेल्या टाक्या आढळतात. या व्यतिरिक्त रांजणा डोंगर सांगणोरे, बांगडगड डोंगर पिंपळगाव जोगा, मुंजाबा ओतूर, महादेव डोंगर पिंपरीपेंढार, खामुंडी, हटकेश्वर (गोंद्रे), बल्लाळवाडी खिंड लेण्याद्री, माळशेज घाट एमटीडीसी, भोरांडे नाळ घाटघर, चितारकडा घाटघर, शंभु डोंगर पूर, कुकडी नदी उगमस्थान सोनतीर्थ डोंगर, कुसुर डोंगर माथा, धामणखेल डोंगर, वनदेव डोंगर खानगाव, बोतार्डे डोंगर, वरसुबाई डोंगरमाथा सुकाळवेढे, गडदबाई टाके हडसर, रामेश्वर टाके नळावणे, मिनेश्वर मिना नदी उगमस्थान आंबोली येथे शिवकालीन टाक्या, पाणीसाठे आढळून येतात.
राज्य शासनाकडून संवर्धन समिती स्थापन
राज्य शासनाने बारव संवर्धन समितीची स्थापना गेल्या आठवड्यात केली आहे. यामुळे राज्यातील हजारो प्राचीन बारवांना गतवैभव प्राप्त होणार आहे. तसेच प्राचीन संस्कृतीचा ठेवा जतन होणार असून पर्यटनालाही चालना मिळणार आहे. मात्र याबाबतचा निधी व आराखडा शासनाने लवकर जाहीर करावा, अशी निसर्गप्रेमी नागरिकांची मागणी आहे.
बारव म्हणजे काय…
बारव म्हणजे पायऱ्या असलेली विहीर. पाण्याचा साठा करण्यासाठी प्राचीन काळापासून देशांमध्ये बारवा अस्तित्वात आहेत. बारव स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना मानले जातात. गुजरातमध्ये रानी की बाव म्हणून जगप्रसिद्ध बारव आहे. गुजरात व राजस्थानमधील बारवांपेक्षा राज्यातील संख्या अधिक होती, असे सांगण्यात येते. राज्यात यादव, शिवकालीन, पेशवेकालीन, होळकर, मराठा अशा वेगवेगळ्या राजवटीमध्ये बारवा बांधल्या गेल्या. कोकणात चिऱ्याच्या दगडात बांधण्यात आलेल्या बारवा या घोडबाव म्हणून ओळखल्या जातात.
जुन्नर तालुक्यातील 5 पुष्करणी
बेल्हे, किल्ले चावंड, धामणखेल खंडोबा डोंगर, किल्ले निमगिरी पायथा, पंचलिंग मंदिर, जुन्नर या व्यतिरिक्त पंचलींग मंदिर तसेच सोमतवाडी भूमिगत पाणीपुरवठा भुयार अजूनही इतिहासाची साक्ष देत आहेत.





