पुणे जिल्हा : खेड न्यायालायात 33 हजार खटले प्रलंबित

न्यायाधीश ए. एस. सय्यद : निपटार्यासाठी लोकअदालत उत्तम मार्ग
राजगुरूनगर – जिल्हा व अतिरिक्त सत्रन्यालायात 33 हजार खटले प्रलंबित आहेत. या प्रलंबित खटल्यांचा निपटारा करण्यासाठी लोकअदालत हा एक उत्तम मार्ग आहे. लोकअदालतमध्ये समझोता व तडजोड करून जास्तीत जास्त प्रलंबित खटले पक्षकारांनी मिटवावेत, असे आवाहन येथील जिल्हा न्यायाधीश ए. एस. सय्यद यांनी केले.
राजगुरूनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत झाली त्याचे उद्घाटन न्यायाधीश सय्यद यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा न्यायाधीश एस. पी. पोळ, न्यायाधीश ए. ए. घनीवाले, न्यायाधीश पी. एस. इंगळे, न्यायाधीश सरिता विश्वभरन, न्यायाधीश एस. बी. नाईकनवरे-गरड, खेड वकील बार असोशिएशन बार उपाध्यक्ष अॅड. बिभीषण पडवळ, अॅड. सोनम नाईकरे, अॅड. अपेक्षा धुमाळ, अॅड. वैशाली मुंगसे, अॅड. अनिल वाडेकर, अॅड. पवन कड, अॅड. प्रमोद वाडेकर, अॅड. साक्षी राक्षे, अॅड. पूनम आरुडे, माजी अध्यक्ष अॅड.अरुण मुळूक, अॅड. देविदास शिंदे, अॅड. चंद्रकांत सांडभोर, अॅड. संदीप घुले, अॅड. अबूबकर पठाण, अॅड. विक्रम कड, अॅड. सुलभा कोटबागी यांच्यासह वकील संघटनेचे सभासद पक्षकार, विविध बँकांचे अधिकारी, पंचायत समितीचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अॅड. पोपटराव तांबे म्हणाले की, खोटा अंहकार, खोटी प्रतिष्ठा जपण्यासाठी न्यायालयात अनेक खटले दाखल होण्याचे प्रमाण जास्त आहे. न्यायालयात आल्यानंतर पक्षकारांना पैसे वेळ जातो. म्हणून आपल्यातील अहंकार, मी पणा बाजूला आपसातील वाद मिटवावा. कायदा सर्वांना सारखा असल्याने विषाची परीक्षा घेऊ नये. आपले आयुष्य खुखकर आणि आनंदी कसे राहील याचा प्रयत्न करावेत.
आयुष्यात न्यायालय आणि हॉस्पिटल ज्या व्यक्तीच्या आयुष्यात येते त्याचे आयुष्य उद्ध्वस्त होते, म्हणून आपणच आपली काळजी घेत वाद टाळावेत व आरोग्याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बिभीषण पडवळ यांनी, सूत्रसंचालन पवन कड, अपेक्षा धुमाळ यांनी तर वैशाली चौधरी यांनी आभार मानले.
राष्ट्रीय लोकअदालतमध्ये दिवाणी-फौजदारी स्वरूपाचे सुमारे 6 हजार खटले ठेवण्यात आले आहेत. दोन्ही पक्षकारांमधील असलेले वाद तडजोडीने मिटवावेत. लोक अदालतचा उद्देश साध्य करावा.
– पी. एस. इंगळे, न्यायाधीश





