Pune District : उजनी धरणातून भीमा नदीत 26 हजार क्यूसेकने विसर्ग

नागरिकांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा
बिजवडी – उजनी धरण शंभर टक्क्यांहून अधिक भरल्याने आज (दि. 19) सायंकाळी 5 वाजता धरणाच्या सांडव्यावरून 26 हजार क्यूसेक इतका पाणी विसर्ग भीमा नदी पात्रात सोडण्यात आला. तसेच पावर हाऊस मधून 1600 क्यूसेक विशेष विसर्ग सोडण्यात आला असून, परिस्थितीनुसार विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता स. शि. मुन्नोळी (उजनी धरण व्यवस्थापन विभाग, भीमानगर) यांनी दिली.
मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडल्याने भीमा नदी पात्र धोकादायक बनले आहे. त्यामुळे कोणीही नदीपात्रात उतरू नये, जनावरे किंवा तत्सम साहित्य तात्काळ सुरक्षित स्थळी हलवावे, तसेच सखल भागातील नागरिकांनी योग्य ती दक्षता घ्यावी, अशा सूचना उजनी प्रशासनाने दिल्या आहेत. उजनी धरणातून उपलब्ध झालेल्या पाण्यामुळे औद्योगिक वसाहती, साखर कारखाने तसेच उपसा सिंचन योजनांवर आधारित शेतकरी सुखावले आहेत. वेळेवर व मुबलक पाणी मिळाल्याने खरीप हंगामासह पुढील हंगामासाठीही पाण्याची चिंता दूर झाली आहे.
या हंगामाची वैशिष्ट्ये
यंदाच्या हंगामात उजनी धरण 104 टक्के भरले असून, उजनीच्या इतिहासात पहिल्यांदाच हे धरण मे महिन्यातच मायनस स्थितीतून बाहेर आले होते. पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच पुणे व परिसरातील धरणसाखळी भागात मुसळधार पावसामुळे धरणे लवकर भरली.
मागील तीन दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे दररोज 5,500 ते 6,000 क्यूसेक इतका विसर्ग भीमा नदीत येत आहे.
परंपरेने उजनी धरण परतीच्या पावसामुळे भरते, मात्र यंदा पावसाळा लवकर सुरू झाल्याने धरणाने वेळेआधीच शंभरी ओलांडली.





