पुणे जिल्हा : 59 पैकी 21 विद्यार्थ्यांना डिस्चार्ज

कडूस येथील विद्यार्थ्यांना विषबाधा प्रकरण : चौघांवर वायसीएममध्ये उपचार सुरू
राजगुरूनगर – कडूस (ता. खेड) येथील दक्षणा फाउंडेशन मधील जेईई आणि नीट परीक्षेचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाली होती. त्यापैकी 4 मुलांवर पुणे येथे उपचार सुरू असून चांडोली ग्रामीण रुग्णालयात 34 विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. उपचार घेत असलेल्या 59 पैकी रविवारी (दि. 21) 21 विद्यार्थ्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.पूनम चिखलीकर यांनी दिली.
दक्षणा फाउंडेशन ही सेवाभावी आणि गैरसरकरी संस्था आहे. ही संस्था देशातील ग्रामीण भागातील आर्थिक दुर्बल; परंतु अभ्यासातील हुशार विद्यार्थ्यांना आयआयटी व मेडिकल एन्ट्रान्सच्या जेईई आणि नीट परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन करते. देशभरातून विद्यार्थी याठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येतात. येथील 600 पैकी 170 विद्यार्थ्यांना शनिवारी (दि. 20) अन्नातून विषबाधा झाली होती. 170 बाधीत विद्यार्थ्यांपैकी 47 मुले आणि 12 मुली अशा 59 विद्यार्थ्यांना उपचारासाठी चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यातील तीन विद्यार्थ्यांची प्रकृती जास्त खालावलेली असल्याने त्यांना शनिवारी पुढील उपचारासाठी यशवंतराव चव्हाण रुग्णालय पिंपरी पुणे येथे पाठविण्यात आले आहे.
रविवारी (दि.21) दुपारी पर्यंत 56 विद्यार्थ्यांवर चांडोली ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू होते. दुपारी पुन्हा एका मुलाला छातीत दुखू लागल्याने त्याला पिंपरी येथे यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. तेथे उपचार घेणार्या विद्यार्थ्यांची संख्या आता चार झाली आहे. ते उपचाराला साथ देत असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले.
59 पैकी 4 विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी पुण्याला पाठवले आहे. उर्वरित 11 मुले व 10 मुली असे 21 विद्यार्थ्यांना रविवारी दुपारी डिस्चार्ज देण्यात आला आहे. 33 मुले 1 मुलगी अशा 34 मुलांवर आजही उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती ठणठणीत आहे.
– डॉ. पूनम चिखलीकर, वैद्यकीय अधीक्षक, चांडोली ग्रामीण रुग्णालय





