Pune District : इंदापुरात 1300 हेक्टर उसाची लागवड

तालुक्यात आडसाली लागवडींना वेग : सरी, आधुनिक पट्टा पद्धतीचा वापर
वडापुरी – इंदापूर तालुक्यामध्ये आडसाली ऊस लागवडीला वेग आला आहे. यंदा तालुक्यात सर्वदूर पाऊस झाल्याने आजमितीला 1300 हेक्टर उसाची लागवड पूर्ण झाली असून पुढील 2 महिन्यांत उच्चांकी 10 हजार हेक्टर आडसाली ऊस लागवड होईल, असा अंदाज कृषी अधिकार्यांसह शेतकर्यांनी व्यक्त केला आहे. तालुक्यात मे महिन्यात झालेल्या पाऊस लागवडीस उशिरा प्रारंभ झाला आहे.
आषाढीवारी झाल्यानंतर सध्या पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी शेतीकामात गुंतले आहेत. शेतकर्यांकडून शेतीच्या मशागतीसुरू होऊन उसाच्या लागवडी देखील सुरू करण्यात आले आहे. आडसाली, पूर्वहंगामी व सुरू ऊस अशा तीन टप्प्यांत उसाची लागवड केली जाते. शेतकरी साडेतीन फूट अंतरावरील सरी तसेच आधुनिक पट्टा पद्धतीने ऊस लागवडी करण्यावर भर देत आहेत. कोएम-86032, फुले-265 या ऊस बियाणांना लागवडीसाठी शेतकर्यांचे प्राधान्य दिसत आहे.
मागील वर्षी साखर कारखान्यांकडून उसाला प्रति टन 2800- 3200 रुपयापर्यंत बाजारभाव मिळाला आहे. चालू वर्षी उसाच्या बेण्याचे बाजारभाव 3500 रुपये प्रतिटन या दराने खरेदी करण्याची वेळ शेतकरी वर्गावर आली आहे.आता सुरू असलेल्या लागवडी कोरडीला सुरू आहे. मजूर प्रतिएकर लागवडीसाठी सहा हजार रुपये घेत आहेत. खताचा खर्च देखील वाढलेला आहे. एकूण उसाच्या उत्पन्नाचा खर्च वाढल्यामुळे तंत्रशुद्ध व अधिक उत्पादन कसे निघेल व अधिकचा नफा कसा मिळवता येईल यावर शेतकर्यांनी भर देत आहेत.
बळीराजा एआय वापरण्याच्या तयारीत
काही शेतकरी रोपवाटिकेतून उसाचे रोप आणून लागवड करत आहेत आणि एआय पद्धतीने ऊस उत्पादन घेण्याच्या तयारीत आहेत. शेतकर्यांकडून लागवड करताना पट्टा पद्धतीने लागवड करण्यावर विशेष भर दिला जात आहे. यामध्ये सरींमध्ये साडेतीन फूट तर दोन पट्ट्यातील अंतर हे साडेचार फूट ठेवण्यात येत आहे. एआय तंत्रज्ञानाचा शेती क्षेत्रात वाढता प्रभाव लक्षात घेता अत्याधुनिक पद्धतीने शेती करणारे अनेक शेतकरी उसाच्या शेतीमध्ये हे तंत्रज्ञान वापराच्या तयारीत आहेत.





