पुणे जिल्हा : शिरूर-हवेलीसाठी पीएमआरडीएकडून सव्वाबारा कोटी

आढळराव पाटील यांची माहिती
लोणीकंद – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर-हवेली विधानसभा मतदार संघातील 12 कोटी 24 लाख रकमेच्या रस्ते विकासकामांसाठी पीएमआरडीएच्या अंदाजपत्रकातून निधी मंजूर करण्यात यश आल्याची माहिती शिवसेना उपनेते व शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.
शिरूर व हवेली तालुक्यातील मोठा भाग पीएमआरडीएच्या हद्दीत येतो. येथील वाढती वाहनांची संख्या व त्यामुळे वाहतुकीवर येणारा ताण लक्षात घेऊन काही महत्वाचे रस्ते सुधारणा करण्याची गरज आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन बोलून दाखवत निधी मंजूर करण्याची मागणी केली होती. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीएमआरडीए आयुक्तांना तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिले होते.
त्यानुसार हवेली तालुक्यातील वाघोली-भावडी -तुळापूर रस्ता सुधारणा करणे इजिमा 126 रु. 5 कोटी 8 लक्ष, रामा 116 केसनंद ते वाडेगाव-गोतेमळा -अष्टापूर- हिंगणगाव रस्ता सुधारणा करणे इजिमा 132 रु. 2 कोटी, रामा 116 केसनंद ते तळेरानवाडी नं-1 जोडरस्ता सुधारणा करणे ग्रामा 78, रु. 1 कोटी 59 लक्ष तर शिरूर तालुक्यातील इजिमा 143 ते बेंदवस्ती (जातेगाव) ते रामा 55 ला जोडणारा ग्रामा 305 डांबरीकरण करणे, रु. 2 कोटी 82 लक्ष आदि कामांना मंजुरी मिळून निविदा काढण्यात आली आहे.
शिरूर- हवेली तालुक्याच्या विकासासाठी मी कटिबद्ध असून 385 कोटी रकमेच्या वढू – तुळापूर येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील 175 कोटींची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या महत्वपूर्ण प्रकल्पाचा तसेच केसनंद येथील पाणी योजनेसह विविध विकासकामांचा शुभारंभ व शिवसेना मेळाव्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची वेळ मागितली असून लवकरच भुमिपूजनाची तारीख निश्चित होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
-शिवाजीराव आढळराव पाटील, म1ाजी खासदार





