Pune District : पुण्यातील युवतीवर अत्याचार करणारा जेरबंद

शिक्रापूर : पुण्यातील युवतीवर शिक्रापूर येथे अत्याचार करणाऱ्याला संभाजीनगर येथे जेरबंद करण्यात आले. योगेश राजेंद्र धनवडे (रा. मनीषा विहार बिल्डींग शिक्रापूर ता. शिरुर), असे अटकेतील तरूणाचे नाव आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील योगेश धनवडे याची पुण्यातील एका युवतीशी ओळख झाल्यानंतर योगेश याने युवतीला लग्नाचे आमिष दाखवून युवतीला वारंवार स्वतःच्या घरी तसेच हॉटेलवर बोलावून युवतीवर जबरदस्तीने वारंवार अत्याचार केले. यानंतर युवतीने लग्नाबाबत चर्चा केली असता युवतीला शिक्रापूरमध्ये बोलावत मी तुझ्याशी लग्न करणार नाही म्हटल्याने युवतीने पोलिसांत जाईल, असे म्हटले.
यावेळी योगेश याने युवतीला शिवीगाळ, दमदाटी करीत मारहाण केली. याबाबत पीडित युवतीने शिक्रापूर पोलिसांत फिर्याद दिल्याने पोलिसांनी योगेश धनवडे याच्याविरुद्ध (दि.१६) मार्च रोजी गुन्हा दाखल केला होता. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर योगेश हा फरार झालेला होता.
योगेश हा संभाजीनगर येथून यवतमाळला जाणार असल्याची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे, पोलीस नाईक सुजित जगताप यांनी थेट संभाजीनगरमध्ये योगेश यास ताब्यात घेत अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे हे करीत आहेत.





