डीपी वेली, झाडाझुडपांनी वेढलेली : वायरिंगही उघड्यावर चाकण – खेड तालुक्यातील चाकण बसस्थानक परिसरातील सार्वजनिक ठिकाणी विद्युत विभागाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. मुख्य रस्त्याच्या कडेला उभारलेली (डीपी) विद्युत यंत्रणा पूर्णपणे वेलींनी आणि झाडाझुडपांनी वेढलेली असून वायरिंग उघड्यावर आहे. ही स्थिती पाहता तिथे कधीही मोठा अपघात घडू शकतो. ही यंत्रणा एका मुख्य वर्दळीच्या ठिकाणी असून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रवासी, वाहने आणि बसगाड्यांची ये-जा सुरु असते. यामध्ये लहान मुले, वृद्ध नागरिक आणि सामान्य प्रवासी यांचा समावेश आहे. तरीही महावितरण किंवा संबंधित यंत्रणांकडून कोणतीही देखभाल किंवा स्वच्छता केली जात नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. विद्युत खांबांवर चढलेल्या वेलींमुळे वायरिंग झाकले गेले असून, कोणतीही गळती किंवा स्पार्किंग झाल्यास मोठी आग लागण्याचा आणि जीवितहानी होण्याचा धोका संभवतो. एवढेच नव्हे तर यंत्रणेच्या खाली असलेले नियंत्रण कक्षाचे पेटी देखील उघडे असून त्यातून वायर बाहेर आलेले आहेत. कोणताही अपघात घडल्यास याची जबाबदारी कोणी घेणार, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत. हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू आहे, आम्ही वारंवार तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. काहीतरी मोठा अपघात झाला की मगच प्रशासन जागे होणार का? असे नागरिक म्हणतात.विद्युत विभागाने तातडीने या ठिकाणी कारवाई करून झाडझुडपांची साफसफाई करावी, उघड्या वायर आणि तुटलेल्या यंत्रणांची दुरुस्ती करावी. अशी नागरिकांनी मागणी केली आहे प्रशासनाची उदासीनता महावितरणच्या दुर्लक्षामुळे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या धोकादायक यंत्रणेकडे कोणीही लक्ष देत नाही. नगर परिषद किंवा विद्युत विभाग यामधील कोणतीही यंत्रणा सक्रिय न झाल्यास ही परिस्थिती भविष्यात गंभीर अपघाताचे कारण होऊ शकते.