Pune :डिस्प्लेचा फ्रीज नवा म्हणून विकला

अनुचित व्यापार पद्धतीबद्दल २५ हजार भरपाई देण्याचा ग्राहक आयोगाचा आदेश
पुणे – दसरा-दिवाळी खरेदीसाठी आलेल्या ग्राहकाला प्रदर्शनासाठी (डिस्प्ले) ठेवलेला रेफ्रिजरेटर (फ्रीज) देणाऱ्या विक्रेत्या साखळी कंपनीला ग्राहक आयोगाने दणका दिला. ग्राहकाने स्पष्टपणे सांगूनही डिस्प्लेचा फ्रीज नवीन म्हणून देण्याची कृती अनुचित व्यापार ठरते. कंपनीने ग्राहकाला २५ हजारांची भरपाई द्यावी, असा आदेश दिला.
अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष डॉ. अरुण गायकवाड आणि सदस्या प्रणाली सावंत यांनी हा निकाल दिला. ग्राहकाच्या स्पष्ट सूचनांकडे काणाडोळा करत अनुचित व्यापार पद्धती अवलंबणाऱ्या आणि सदोष ग्राहक सेवा देणाऱ्या विक्रेत्यांना चाप लागला आहे. या प्रकरणी शिवाजीनगरचे रहिवासी डॉ. विरेंद्र जाधवराव यांनी कोहिनूर टेलिव्हिडिओ कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व बाणेर येथील शोरूमच्या व्यवसाय विकास व्यवस्थापकांच्या विरोधात ग्राहक आयोगाकडे दाद मागितली होती. तक्रारदारांतर्फे ॲड. श्रीराम करंदीकर यांनी बाजू मांडली. तक्रारदारांनी ८ सप्टेंबर २०१९ रोजी शोरूममधून ६५ हजारांचा फ्रीज विकत घ्यायचे ठरविले.
त्यावेळी डिस्प्लेसाठी ठेवलेला फ्रीज ऐवजी नवीन फ्रीज देण्याची स्पष्ट सूचना केली होती. खबरदारी म्हणून डिस्प्लेसाठी ठेवलेल्या फ्रीजच्या नोंदणी क्रमांकाचे छायाचित्रही घेतले. कंपनीने या गोष्टी मान्यही केल्या. प्रत्यक्षात फ्रीज घरी आला तेव्हा तो डिस्प्लेला ठेवलेलाच निघाला. नोंदणी क्रमांकावरून ही बाब लक्षात आले. तसेच तक्रारदारांनी डेबिट कार्ड वापरून कर्ज घेताना कंपनीच्या प्रतिनिधींनी चुकीची माहिती दिल्याने त्यांच्या खात्यातून पाच हजार ४१५ रुपयांची छुपी रक्कमही वसूल केल्याचा दावा केला.
या तक्रारींचे निवारण न झाल्याने तक्रारदारांनी ग्राहक आयोगात धाव घेतली. नोटीस मिळण्यापूर्वीच कंपनीने दिलगिरी व्यक्त केली. उत्सव काळात अनावधानाने डिस्प्लेचा फ्रीज नवीन म्हणून पाठविल्याची कबुली देत कंपनीने फ्रीज बदलून दिला. तसेच दहा हजारांचा परतावाही दिल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले. मात्र, ग्राहकाला शारीरिक, मानसिक त्रास झाल्याचे सांगत २५ हजार देण्याचा आदेश आयोगाने दिला.





