गव्यास मारले ते पाकिस्तान-चीनच्या चिथावणीमुळेच!

Updated On:

मुंबई  – पुण्यातील कोथरूडमध्ये महात्मा सोसायटीत (बुधवार) सकाळी रानगवा (Indian Gaur) दिसून आला. रानगवा दिसल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली होती. त्यानंतर वन विभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं होतं. पाच तासाच्या  अथक प्रयत्नानंतर रानगवाला पकडण्यात वन विभागाला यश मिळालं होतं. पण, अखेर त्या रानगव्याचा मृत्यू झाला.  धावाधाव झाल्यामुळे घाबरून (धाप लागून) मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे. अशी माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.

पुणे – अखेर ‘त्या’ रानगव्याचा दुर्दैवी मृत्यू

यातच आता सामनाच्या  अग्रलेखातून या मुद्यावरून  भाजप पक्षाचा खरपूस समाचार घेतला आहे. आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून  ‘पुण्याने हेही करून दाखवले! गव्यास मारून दाखवले’ हा अग्रलेख लिहण्यात आला आहे.

काय आहे सामनाचा अग्रलेख ?

एका गव्यास पुणेकरांनी मारून दाखवले. पुणेकरांनी हेसुद्धा करून दाखवलं. चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड मतदारसंघात हे घडले. भाजपवाले आता असा आरोप करतील की, हे नक्कीच महाविकास आघाडीचे अपयश आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणतील, गव्यास मारले ते पाकिस्तान-चीनच्या चिथावणीमुळेच! पदवीधर-शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत काही मानवी गव्यांना लोकांनी वेसण घातली. त्याचा राग रानगव्यास मारून कोणी काढला काय? पुणे तिथे काय उणे!

पुणे व आसपासच्या परिसरात अधूनमधून हिंसक, अमानुष घटना घडत असतात. मनुष्य आहे तेथे रावण आहेच, पण रावणातही किमान माणुसकी होती. अशोकवनात सूक्ष्म रूपाने घुसलेल्या हनुमानाच्या शेपटीला त्याने फक्त आग लावली, निर्घृणपणे ठार केले नाही, पण आपले पुणेकर दोन पावले पुढेच आहेत. शौर्य दाखविण्याच्या धुंदीत ते इतके निर्घृण झाले की, चुकून शहरात शिरलेल्या एका रानगव्यास हाल हाल करून मारले आहे. कोथरूड भागातील महात्मा सोसायटीत सकाळच्या वेळी रानगवा दिसला. कोथरूडकरांना नेहमीप्रमाणे आधी चिंता वाटली व मग आश्चर्य वाटले. मुळात हा अगडबंब प्राणी म्हणजे नक्की काय आणि कसा? या संशोधनातच थोडा वेळ गेला असावा. हा माजलेला वळू आहे की रेडा? हा गेंडा आहे की मस्तवाल टोणगा? हे समजून घेईपर्यंत रानगवा इकडून तिकडे टकरा देत होता. जुन्नर, आंबेगाव परिसरात बिबटय़ाचे दर्शन होत असते.

मनुष्यवस्तीत शिरून बिबटय़ा हल्लेही करतो, पण रानगवा नावाचा वजनदार प्राणीदेखील आता शहरात, गावात घुसून धुमाकूळ घालू लागला आहे. जंगलातील प्राणी मनुष्यवस्त्यांत घुसतात याचे मुख्य कारण मनुष्याने जंगलावर अतिक्रमण केले आहे. असा एक गवा पुणे परिसरात घुसला व मनुष्याच्या क्रौर्यामुळे मृत्युमुखी पडला. आम्ही वाघ वाचवतो, साप वाचवतो. बिबटे, हत्ती वाचवतो, पण एका गव्यास निर्घृणपणे मारतो. याआधी रत्नागिरी, सांगली, वाळवा-शिराळा भागात गवा घुसला होता. 


भंडारा येथील गोसीखुर्द कालव्यात गवा पडला तेव्हा दोरीचा फास टाकून लोकांनी त्यास बाहेर काढले. रत्नागिरीत विहिरीत पडलेल्या गव्यासही वाचवले होते, मग पुण्यात शिरलेल्या गव्यावर तडफडून प्राण सोडण्याची वेळ का आली? जंगलातील चारापाणी संपले असावे. त्या भटकंतीत गवा पुण्यात शिरला तर त्याला मारण्यात आले. आमच्या जंगल खात्याच्या कर्मचाऱयांना असे प्रसंग हाताळण्याचे नीट प्रशिक्षण आहे काय? त्यांनी पिंजरे लावून बिबटे पकडले असतील, पण रानगव्याचे रेस्क्यू ऑपरेशन जमले नाही. गवा ताब्यात येत नव्हता. कारण गव्यापेक्षा लोकच जास्त बिथरले. 

लोकांनी गव्यास दगड मारले, हाकारेहुकारे देऊन त्याला या गल्लीतून त्या गल्लीत पळवले. गव्याचा मेंदू पुणेकरांप्रमाणे तल्लख, टोकदार नव्हता. गव्याचा मेंदू जंगली होता. तो मिळेल तिथे धडका देत राहिला. पुन्हा हा गवा म्हणजे एखाद्या मस्तवाल राजकीय नेत्याप्रमाणे उंडारतो आहे अशा भ्रमात लोकांनी त्याला घायाळ केले. गवा जखमी झाला तेव्हा वनखात्याच्या लोकांनी त्यास बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन त्याच्या तोंडावर फडके बांधले. या सगळय़ा गोंधळात गव्याचे हृदय बंद पडले व त्याचे प्राणोक्रमण झाले. गवा हा डोंगराळ प्रदेशात आढळतो. दिसायला मजबूत बांध्याचा असला तरी तो शाकाहारीच आहे.

आणखी संबंधित बातम्या

Wagholi News: शिक्षक-पदवीधर निवडणुकांपूर्वी वाघोलीत राजकीय नियम धाब्यावर? आचारसंहिता भंग केल्याचा आरोप

2026-10-08 13:32:59

Wagholi News: शिक्षक-पदवीधर निवडणुकांपूर्वी वाघोलीत राजकीय नियम धाब्यावर? आचारसंहिता भंग केल्याचा आरोप

Nana Patekar Death: ‘अभिनयाचा नाना’ ते कारगिलचा जवान ; दोन महिने सीमेवर राहून शत्रूशी लढले, जाणून घ्या लष्कराशी नातं

2026-10-08 12:28:45

Nana Patekar Death: ‘अभिनयाचा नाना’ ते कारगिलचा जवान ; दोन महिने सीमेवर राहून शत्रूशी लढले, जाणून घ्या लष्कराशी नातं

Nana Patekar Funeral: अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

2026-10-08 09:50:15

Nana Patekar Funeral:  अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

FDA: डिटर्जंट, केमिकल वापरून भेसळ ; पुणे विभागात एफडीएकडून दूध संस्‍थांना दणका

2026-10-08 07:48:38

FDA: डिटर्जंट, केमिकल वापरून भेसळ ; पुणे विभागात एफडीएकडून दूध संस्‍थांना दणका

Katraj-Kondhwa: मध्यरात्री पोकलेन-ब्रेकरचा दणदणाट

2026-10-08 07:27:57

Katraj-Kondhwa: मध्यरात्री पोकलेन-ब्रेकरचा दणदणाट