FDA: डिटर्जंट, केमिकल वापरून भेसळ ; पुणे विभागात एफडीएकडून दूध संस्थांना दणका
FDA:

FDA: दूध भेसळीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे जिल्ह्यात मोठी कारवाई केली आहे. दुधामध्ये डिटर्जंट, तसेच नॉनिलफेनॉल इथॉक्सिलेट या रसायनाचा वापर होत असल्याचे तपासातून समोर आले आहे. मंचर येथून कारवाईला सुरुवात झाली. या प्रकरणात आतापर्यंत ३७ आरोपी निष्पन्न झाले असून, २५ जणांना अटक केली आहे.
भेसळयुक्त दूध तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थांच्या पुरवठ्यापासून ते दूध संकलन, शीतकरण आणि प्रक्रिया डेअरीपर्यंतची संपूर्ण साखळी एफडीएने तपासली.
मंचर येथील कारवाई दरम्यान दुधातील घटक वाढविण्यासाठी वापरली जाणारी व्हे पावडर, डिटर्जंट आणि मिश्रण स्थिर ठेवणाऱ्या पदार्थांसह विविध पदार्थ जप्त करण्यात आले. त्यानंतर आकाश डेअरी फार्म येथे घेतलेल्या सहा दूध नमुन्यांच्या तपासणीत सर्व नमुने डिटर्जंटयुक्त आढळले.
भेसळ द्रव्यांचे पुरवठादार, वाहतूकदार, दूध संकलन केंद्रांशी संबंधित व्यक्ती, दूध शीतकरण केंद्रांशी संबंधित व्यक्ती, दुग्ध व्यावसायिक आदींचा त्यामध्ये समावेश आहे. २६ अन्न आस्थापनांचे परवाने अथवा नोंदणी निलंबित किंवा व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासह इंदापूर, माळशिरस येथील संस्थांवरही कारवाई करण्यात आली.
या संस्थांची तपासणी
– नवकार डिस्ट्रिब्यूटर्स (भोरामळा, ता. आंबेगाव)
– आकाश डेअरी फार्म, (मंचर)
– पिरसाई मिल्क अँड मिल्क पावडर.
– अर्थव मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट इंडस्ट्रीज (शिरवे ता. आंबेगाव)
– सोनाई डेअरी (गोखळी, इंदापूर).
संपूर्ण साखळीवर कारवाई
अन्न व औषध प्रशासनामार्फत राज्यातील दूध संकलन केंद्रे, दूध शीतकरण केंद्रे, डेअरी व दूध प्रक्रिया उद्योग, तसेच दूध भेसळीसाठी वापर होण्याची शक्यता असलेल्या पदार्थांच्या पुरवठा साखळीवर विशेष लक्ष ठेवून संबंधित प्रत्येक जबाबदार व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाईचे प्रशासनाचे धोरण आहे.
महाराष्ट्रात अन्नपदार्थांची गुणवत्ता व कायद्याच्या अंमलबजावणीबाबत शासन अत्यंत कठोर आहे. ग्राहकांच्या आणि जनतेच्या आरोग्याशी खेळ खपवून घेतला जाणार नाही. मुदतबाह्य किंवा फेरफार केलेल्या अथवा अस्वच्छ व असुरक्षित परिस्थितीत तयार केलेल्या अन्नपदार्थांची विक्री, साठवणूक करणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाई चालूच राहील.
– तुकाराम मुंढे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन





