Katraj-Kondhwa: मध्यरात्री पोकलेन-ब्रेकरचा दणदणाट
Katraj-Kondhwa:

कात्रज-कोंढवा रस्त्यावर स्त्याच्या कामासाठी नियम मोडीत
Katraj-Kondhwa: कात्रज-कोंढवा रस्त्याचे रखडलेले काम वेगाने पूर्ण करण्याच्या घाईत आता रात्रीच्या शांतत नियमांचा बळी दिला जात आहे. रस्त्याच्या कामासाठी मध्यरात्री पोकलेन आणि ब्रेकरच्या साहाय्याने खोदाई सुरू असल्याने परिसरातील नागरिकांची झोप उडाली आहे.
कर्कश आवाजामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी ११२ क्रमांकावर पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रात्री सुरू असलेले काम थांबवले.
कात्रज-कोंढवा रस्त्याचे काम गेल्या सुमारे नऊ ते दहा वर्षांपासून रखडले आहे. या रस्त्यावर झालेल्या अपघातांमध्ये आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी सातत्याने होत आहे. मात्र, कामाचा वेग वाढविण्याच्या नावाखाली रात्रीच्या वेळी मोठ्या आवाजात यंत्रसामग्री वापरणे योग्य आहे का, असा सवाल आता उपस्थित झाला आहे.
ध्वनिप्रदूषणाच्या नियमांनुसार रात्रीच्या वेळेत मोठ्या आवाजाची बांधकाम, खोदाई आणि अन्य कामे करण्यावर निर्बंध आहेत. तसेच न्यायालयानेही ध्वनिप्रदूषणाबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. असे असताना रात्री पोकलेन-ब्रेकरचा वापर करण्यास नेमकी कोणाची परवानगी आहे, याबाबत महापालिका प्रशासनाकडून स्पष्टता मिळालेली नाही.
रात्री पोकलेन-ब्रेकरचे काम करता येत नाही. ध्वनिप्रदूषणाचा विषय येतो. या रस्त्यासाठी रात्री काम करण्याची अद्याप कोणतीही परवानगी दिलेली नाही. तरीदेखील नेमके काय झाले, याची तपासणी करून सांगतो.
– डॉ. संदीप भाजीभाकरे, उपायुक्त, वाहतूक शाखा, पुणे
कात्रज-कोंढवा रस्त्याचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. दिवसभर खोदाईचे काम सुरू असते. रात्री प्रामुख्याने मुरूम आणि इतर साहित्याचे स्थलांतर केले जाते. काही ठिकाणी पोकलेन सुरू असण्याची शक्यता आहे. याबाबत माहिती घेतो.
– धनंजय गायकवाड, कार्यकारी अभियंता, महापालिका





