Pune: हडपसरमध्ये धो-धो; सोलापूर महामार्ग पाण्याखाली

हडपसर – हडपसरमध्ये सायंकाळी ५:०० ते ६:०० या तासाभरात मुसळधार पाऊस झाल्याने संपूर्ण परिसरात पाणीच पाणी झाले. पुणे-सोलापूर महामार्ग ठिकठिकाणी पाण्याखाली गेल्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली. हडपसरमध्ये या तासाभरात १३ मि.मि. पावसाची नोंद झाली.
हडपसर परिसात सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान मुसळधार पाऊस सुरू झाला. यामध्ये अमर बाग येथील चौक, रामोशी आळीकडे जाणारा रस्ता, मगरपट्टा चौक आणि मांजरी रस्त्यावरील मनिरत्न आंगण सोसायटी समोरील रस्ता आणि अनेक अंतर्गत रस्त्यावर पाणीच पाणी झाले . पुणे-सोलापूर महामार्गा गाडीतळ परिसरात पाणी साचल्याने वाहतूक संथगतीने सुरू होती.
दुचाकीचालकांना पाण्यातूनच वाट काढावी लागली. हडपसर गावातील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिले. तर मांजरी- महादेवनगर रस्त्यावर मनिरत्न आंगण सोसायटी समोरील भागात तसेच आण्णासाहेब मगर महाविद्यालय प्रवेशद्वार समोर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.
महापालिका प्रशासनाने लोहिया उद्यान समोरील रस्ता, अमर बाग सोसायटी व मनिरत्न आंगण सोसायटी समोरील रस्त्यावर पावसाळी गटारीचे काम केले आहे. मात्र, छोट्या छोट्या पावसाळ्यात येथे पाणी साचून रहात आहे. त्यामुळे महापालिकेने केलेल्या येथील पावसाळी वाहिनीच्या कामांबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.





