PUNE: हिवाळ्याचे दिवस असूनही थंडीचे प्रमाण जेमतेमच; राज्याला पुन्हा अवकाळीचा धोका

पुणे – डिसेंबरअखेर देश आणि महाराष्ट्रात थंडीचे प्रमाण सरासरीपेक्षा कमीच राहिले. येत्या काळात राज्यात तापमान वाढण्याची चिन्हे आहेत. शिवाय, देशात थंडीची लाट कोठेही अनुभवता आली नाही. पुढील दीड महिन्यांत फार तर एक किंवा दोन लाटा येतील. शिवाय, महाराष्ट्रात काही ठिकाणी अवकाळी पावसाची चिन्हे आहेत.
हवामानशास्त्र विभागाने आगामी महिनाभरासाठीचा अंदाज नुकताच जाहीर केला. त्यात म्हटल्यानुसार, महाराष्ट्राला पुन्हा अवकाळीचा धोका असून कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आा आहे. दरम्यान, काही भागांमध्ये पहाटे आणि रात्री कडाक्याची थंडी जाणवेल. पण, तिचे प्रमाणही कमी होणार आहे. एल-निनोच्या परिणामामुळे हा वातावरणीय बदल निर्माण झाला आहे.
दरम्यान, जानेवारीत देशाच्या बहुतांश भागांमध्ये रात्रीचे तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता ६५ टक्के आहे, असे हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा म्हणाले.
उत्तर ध्रुवाकडून वाहणारे वारे क्षीण
एल-निनोमुळे उत्तर ध्रुवीय प्रदेशात यंदा अपेक्षित थंडी पडलेली नाही. त्यामुळे तिकडून येणाऱ्या थंड वाऱ्याच्या प्रवाहात फारसा जोर नाही. उत्तर ध्रुवासह आर्टिक प्रदेश, सैबेरिया यासारख्या अतिशीत प्रदेशातील किमान तापमान अपेक्षित प्रमाणात खाली गेले नाही. त्यामुळे उत्तरेकडून दक्षिण आशियाकडे वाहणारा थंड हवेचा प्रवाह क्षीण आहे.
पावसासह तापमानही अधिक
देशभरात जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे., जानेवारीमध्ये देशभरात किमान तापमानही सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे, असे महापात्रा यांनी स्पष्ट केले आहे.





