Pune : तक्रार देण्याची धमकी देऊन २० लाखांची मागणी

पुणे : बुलेट, तसेच मोटारविक्री करणाऱ्या कंपनीविरुद्ध केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार देण्याची धमकी देऊन २० लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांविरुद्ध वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी विजय म्हस्के आणि अविनाश रमेश रोकडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका ढोणे कार प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील वरिष्ठ व्यवस्थापकाने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणाच्या मावसभावाची ही कंपनी आहे. कंपनीचे कार विक्री करण्याचे दालन वारजे भागात आहे. या दालनातील सर्व जबाबदारी पाहण्याचे काम त्यांच्याकडे आहे. आराेपी विजय म्हस्के २०१७ मध्ये संबंधित कंपनीत कामाला होता. सहा महिने काम केल्यानंतर त्याने काम सोडून दिले होते. वारजे भागात कंपनीचे सर्व्हिस सेंटर आहे. त्यानंतर म्हस्केने ११ मार्च रोजी तक्रारदाराच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. कंपनीच्या कामासंदर्भात भेटायचे आहे, असे सांगून त्याने त्यांना मार्केटयार्ड भागातील एका हाॅटेलमध्ये बोलाविले.
वारजे भागातील कंपनीच्या सर्व्हिस सेंटर पर्यावरणविषयक निकषांची पूर्तता केली नाही. कंपनीकडे याबाबतचे प्रमाणपत्रही नाही. याबाबत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार देणार आहे, तसेच याबाबत देण्यात आलेली नोटीस त्याने व्यवस्थापकाला दाखविली. याप्रकरणाचा पाठपुरावा मी करणार आहे, तसेच या प्रकरणाचा पाठपुरावा करून मंत्रालयात तक्रार देऊन तुमची कंपनी बंद पाडतो. पाठपुरावा न करण्यासाठी २० लाख रुपये द्यावे लागतील,’ अशी मागणी म्हस्केने केली.
म्हस्केच्या सांगण्यावरुन अविनाश राेकडेने तक्रारदाराच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. नोटीस मागे घ्यायची असेल तर २० लाख रुपये द्यावे लागतील, अशी धमकी दिली. म्हस्के आणि रोकडे यांच्या धमक्यांमुळे घाबरलेल्या व्यवस्थापकाने पोलिसांकडे तक्रार दिली. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन तरडे करत आहेत.




