Pune : कात्रज डेअरी रस्त्यावर धोकादायक फूटपाथ

कात्रज – स्वारगेट-सातारा रस्त्यावरील कात्रज दूध कार्यालयाजवळील सरहद कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावरील उंच फूटपाथचा भाग ढासळल्याने पादचारीही कोलमडून पडत आहे. फुटपाथचा ढासळलेला भाग रस्त्यावरच पडल्याने, त्यावरून जाणारी वाहनेही आदळत आहेत. याच फूटपाथवर ट्रान्सफॉर्मवर असल्याने पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होत आहे.
या रस्त्याचा तीव्र उतार कमी करण्याचे काम गेल्या वर्षी करण्यात आले. मात्र, या दुरुस्ती कामात महापालिकेच्या पथविभागाने फूटपाथच्या उंचीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. फूटपाथ उंच असल्याने नागरिकांच्या वापरासाठी निरुपयोगी ठरत आहे. फूटपाथवर चढणेही कठीण झाल्याने पादचाऱ्यांना नाइलाजाने रस्त्यावरून चालावे लागते.
याच रस्त्यालगत कचरा हस्तांतरण प्रकल्प असल्याने अनेकदा प्रकल्पाजवळील रस्त्याची एक लेन वाहतुकीसाठी बंद केली जाते, ज्यामुळे एकेरी वाहतूक सुरू होते, अशा स्थितीत, ढासळलेल्या फूटपाथमुळे अपघाताचा धोका आहे. फूटपाथची उंची कमी करून ढासळलेला भाग तातडीने दुरुस्त करावा, अशी मागणी होत आहे.
विद्यार्थ्यांची गैरसोय…
कात्रज डेअरी चौक ते सरहद कॉलेज (पुणे-काश्मीर मैत्री चौक) या रस्त्यावर कचरा हस्तांतरण केंद्रावर येणारे मोठे कचरा वाहतूक ट्रक आणि इतर वाहने अनेकदा रस्त्याच्या बाजूला उभी केली जातात. यामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होते. या भागात अनेक शैक्षणिक संस्था असल्याने मोठ्या संख्येने विद्यार्थी याच रस्त्याचा वापर करतात, ज्यामुळे त्यांचीही गैरसोय होत आहे.
‘परिसरात पर्यटन स्थळ, शैक्षणिक संस्था असल्याने मोठी वर्दळ असते. कचरा वाहतूक करणाऱ्या गाड्या सतत धावत असल्याने अनेक जण फूटपाथचा वापर करतात. अशा स्थितीत हा तुटलेला आणि उंच फूटपाथ नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. शास्त्रोक्त पद्धतीने या फूटपाथची दुरुस्ती करण्यात यावी.’- गिरीराज सावंत,अध्यक्ष, कार्यसिद्धी प्रतिष्ठान.
‘कात्रज डेअरी रस्त्यावरील फूटपाथची दुरुस्ती तत्काळ करण्यात येईल. तसेच, फूटपाथची उंची कमी करण्यासाठी निधीची मागणी करून संपूर्ण काम केले जाईल. याबाबत महापालिकेतील वरीष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असून लवकरच काम करण्यात येइल.’ – दिलीप पांडकर, उपअभियंता, पथविभाग, मनपा





