पुणे : दाभोलक हत्या प्रकरण : प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराची उलटतपासणी

पुणे – डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या केल्याचा आरोप असलेले सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना ओळखणाऱ्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराची बुधवारी बचाव पक्षाने उलटतपासणी घेतली. या वेळी प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने गोळीबाराचा आवाज काढून, किती अंतराने गोळीबाराचा आवाज ऐकू आला, हे न्यायालयास सांगितले.
विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, ऍड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे अशा पाच आरोपींवर आरोप निश्चिती करण्यात आली आहे. या घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या मनपा स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्याची शनिवारी साक्ष नोंदविण्यात आली होती.
दरम्यान, डॉ. दाभोलकर यांच्यावर अंदुरे आणि कळसकर यांनी गोळीबार केला आणि त्यानंतर दोघे तेथून फरार झाले, अशी साक्ष या कर्मचाऱ्याने नोंदवली होती. त्यावर बचाव पक्षाचे वकील ऍड. प्रकाश साळसिंगीकर यांनी या साक्षीदाराची उलटतपासणी घेतली.
सीबीआयने सादर केलेल्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराला जबाबाशिवाय इतर काहीही सांगता आलेले नाही. या प्रकरणातील फिर्यादी पोलीस उपनिरीक्षकांनी साक्ष नोंदविताना घटनेच्या दिवशी ओंकारेश्वर मंदिराजवळ नाकाबंदी असल्याचे सांगितले होते. त्याबाबत प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराला सांगता आलेले नाही. इतर तपशीलही साक्षीदाराने सांगितलेले नाहीत.
– ऍड. प्रकाश साळशिंगीकर, बचाव पक्षाचे वकील





