Pune Crime: बोनसमधील रक्कम पार्टीसाठी देण्यास नकार दिल्याने तरुणावर तलवारीने वार

पुणे – येरवड्यातील श्रमिक वसाहत परिसरातील मोकळ्या जागेत सहा जणांच्या टोळक्याने एका तरुणावर तलवार पालघन सारख्या धारधार हत्याराने वार करून खूनाचा प्रयत्न केला. कंपनीकडून मिळालेल्या बोनसपैकी 8 हजार रुपये पार्टीसाठी देण्यास नकार दिल्याने हा हल्ला करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास घडली आहे.
या प्रकरणी येरवडा पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन चौघांना अटक केली आहे. स्वप्नील किसन भालेराव (वय 27, रा. कलवड वस्ती), अश्पाक अब्दुल रज्जाक सय्यद ऊर्फ तौफिक (वय 30, रा. श्रमिक वसाहत, येरवडा), रोहित सुधाकर ब्रम्हराक्षे (वय 24, रा. कलवड वस्ती) आणि हुजेफ रिजवान शेख (वय 23, रा. श्रमिक वसाहत, येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत नागेश कोपे (वय 30, रा. एकता सोसायटीनगर, विश्रांतवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे ओळखीचे आहेत. फिर्यादी यांना कंपनीकडून बोनस मिळाला होता. हे आरोपींना माहिती झाले. तेव्हा त्यांनी बोनसपैकी 8 हजार रुपये पार्टी करण्यासाठी फिर्यादीकडे मागितले. त्याला फिर्यादी यांनी नकार दिला.





