Pune Crime : कोथरूडमध्ये चोरट्यांचा थरार! तरुणाला मारहाण करीत हजारांचे सोने लुटले

प्रभात वृत्तसेवा
पुणे – कोथरूड भागातील राहुलनगर सोसायटीत रविवारी पहाटे शिरलेल्या चोरट्यांनी सदनिकेत शिरून एका तरुणावर हल्ला केला. चोरट्यांनी तरुणाच्या डोक्यात गज मारल्याने तो गंभीर जखमी झाला. या घटनेत आदित्य हेमंत ढवळे (४२, रा. राहुलनगर सोसायटी, कोथरूड) हे गंभीर जखमी झाले आहेत. ढवळे यांनी याबाबत अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोथरूड भागातील महर्षी कर्वे पुतळ्यासमोर राहुलनगर सोसायटी आहे. रविवारी (२८ सप्टेबर) पहाटे पावणेचारच्या सुमारास चोरटे सोसायटीच्या आवारात शिरले. पी-१ या इमारतीतील सदनिकेत ढवळे राहायला आहेत.चोरट्यांनी सदनिकेचा दरवाजा ठोठावल्यानंतर ढवळे यांनी दरवाजा उघडला. चाेरट्यांनी आतमध्ये शिरत ढवळे यांना धमकावले. ढवळे यांनी चोरट्यांना विरोध केला असता चोरट्यांशी त्यांची झटापट झाली. चोरट्यांनी त्यांच्या डोक्यात लोखंडी गज घातला.
ढवळे गंभीर जखमी झाले. त्यानंतर चोरट्यांनी शयनगृहातील कपाट उचकटून ७० हजारांचे दागिने लुटून जीवे मारण्याच धमकी देत चोरटे पसार झाले. जखमी अवस्थेतील ढवळे यांनी या घटनेची माहिती पाेलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच सहायक आायुक्त अजय परमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक गणेश दीक्षित पुढील तपास करीत आहेत.





