Pune Crime: स्वारगेट स्थानकातील चोरीच्या घटना थांबेनात! ज्येष्ठ नागरिक टार्गेट; आरोपी मोकाट

पुणे- स्वारगेट एस.टी. स्थानक आणि स्वारगेट पीएमपीएल बस थांबा परिसरात पुन्हा एकदा सोने चोरीच्या घटना घडल्या आहेत. दोन ज्येष्ठ महिलांच्या ५० हजार रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी लांबवल्या. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे दोन्ही घटनांत आरोपी अजूनही मोकाट असून, स्थानकातील सुरक्षेचा ढिसाळपणा पुन्हा एकदा समोर आला आहे.
पहिल्या घटनेत आंबेगाव पठार येथे राहणाऱ्या ६५ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. मंगळवारी (दि ८) सकाळी साडेसातच्या सुमारास फिर्यादी या प्रवासासाठी स्वारगेट एसटी स्टँड येथे आल्या होत्या. एस.टी. स्थानकातून सोलापूर बसमध्ये चढताना, गर्दीचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्या हातातील ५० हजार रुपये किमतीची सोन्याची बांगडी चोरून नेली. बांगडी चोरी गेल्याचे लक्षात येताच त्यांनी स्वारगेट पोलिसांत धाव घेत फिर्याद दिली. मंगळवारी ही घटना घडली. मात्र, अद्याप यातील आरोपीला शोधण्यात पोलिसांना अपयश आले आहे.
दुसरी घटना शनिवारी (दि.५) सायंकाळी सहा वाजता घडली. याबाबत सदाशिव पेठ येथील ७१ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी या सारसबाग येथील सणस ग्राउंड बसस्टॉप येथून घोटावडे जाणाऱ्या पीएमपीएल बसमध्ये चढत असताना, चोरट्याने गर्दीचा गैरफायदा घेत त्यांच्या हातातील ५० हजार रुपये किमतीची सोन्याची बांगडी कापून नेली. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, आरोपी फरार आहे. स्वारगेट पोलीस पुढील तपास करीत आहेत.
…जेष्ठ नागरिक टार्गेट, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह –
या दोन्ही घटनांमधे आरोपींनी जेष्ठ महिलांना टार्गेट करून सोने लांबविले आहे. त्यामुळे स्वारगेट परिसरातील प्रवासी, विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काही महिन्यांपूर्वी स्वारगेट एस.टी. स्थानकात घडलेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर सुरक्षेचे उपाययोजना करण्याच्या घोषणा करण्यात आल्या होत्या. मात्र, या प्रकारांवर नियंत्रण येताना दिसत नसून, स्थानकातील सीसीटीव्ही, पोलिस बंदोबस्त व दक्षतेच्या बाबतीत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.





