Pune Crime: मुठा उजवा कालव्याची सीमा भिंत पाडून रस्ता बांधला; बिल्डरवर गुन्हा दाखल

पुणे – गुलटेकडी येथील मुठा उजवा कालव्याच्या सुरक्षेसाठी बांधलेली सिमाभिंत पाडून त्या जागेतून अनधिकृतरित्या रस्ता बांधल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पाटबंधारे विभागाकडून देण्यात आलेल्या फिर्यादीनुसार बांधकाम व्यावसायिकावर स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बिम्स अँड शाईन रियल्टीज प्रा. लि. कंपनीचे अमित अनिल ललवाणी आणि अन्य अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता रोहन वासुदेव ढमाले (३१, रा. आंबेगाव) यांनी फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुलटेकडी येथे पाटबंधारे विभागाकडून मुठा उजवा कालव्याच्या सुरक्षेसाठी सीमाभिंत उभारण्यात आलेली आहे. येथे जवळच ललवाणी यांच्या कंपनीकडून प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याची वाहतूक करण्यासाठी त्यांच्याकडून सीमाभिंत पाडून २ लाख ७८ हजारांचे नुकसान करण्यात आले.
या जागेत विनापरवाना, अनधिकृतरित्या प्रवेश करत सिमेंट काँक्रिटचा रस्ता तयार करून सरकारी जागेचा वापर केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. पाटबंधारे विभागाकडून देण्यात आलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. स्वारगेट पोलीस पुढील तपास करत आहेत.





