Pune Crime : पुणे पोलिसांचा दणका! बुधवार पेठेत ५ बांगलादेशी ताब्यात, दलालाच्या मुसक्या आवळल्या
Pune Crime : पुणे पोलिसांची मोठी मोहीम; अवैध वास्तव्यास असलेल्या ४ महिला आणि १ पुरुष फरासखाना पोलिसांच्या जाळ्यात.

Pune Crime – पुणे शहरातील बुधवार पेठ परिसरात अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांवर फरासखाना पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. छापा टाकून ४ बांगलादेशी महिला आणि १ पुरुष यांना ताब्यात घेण्यात आले असून, या महिलांना वेश्याव्यवसायासाठी भाग पाडणाऱ्या एका दलालाला अटक करण्यात आली आहे.
पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरात अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली फरासखाना पोलीस ठाण्याने ही कारवाई केली.
फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड, उपनिरीक्षक अरविंद शिंदे व पोलिसांच्या पथकाने बुधवार पेठेतील रेडलाईट परिसरातील जनता बिल्डिंग येथे छापा टाकला. या कारवाईदरम्यान ४ बांगलादेशी महिला व १ पुरुष आढळून आले.
चौकशीत या महिलांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले जात असल्याचे उघड झाले. या गुन्ह्यात भूपसिंग श्रीमंगलसिंह राजपूत (२८, रा. बुधवार पेठ) याला अटक करण्यात आली असून, इतर संबंधित आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे करीत आहेत.
दरम्यान, आतापर्यंत वेगवेगळ्या कारवायांद्वारे सुमारे ७० बांगलादेशी महिला व पुरुष यांना ताब्यात घेऊन त्यांना स्वदेशी पाठविण्याची प्रक्रिया करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.




