Pune Police : बांगलादेशी तरुणीवरची कारवाई टाळली; महिला पोलिसाच्या निलंबनाचे आदेश
Pune Police : वरिष्ठांना माहिती न देता पैसे स्वीकारल्याचा ठपका; उपायुक्त कृषीकेश रावले यांनी दिले कडक कारवाईचे आदेश.

Pune Police – बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी तरुणीवर कारवाई न करणाऱ्या फरासखाना पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवालदाराला निलंबित करण्याचेा आदेश परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले यांनी दिले. बांगलादेशी तरुणीबाबतची माहिती मिळाल्यानंतर ती माहिती वरिष्ठांना दिली नाही, तसेच तरुणीकडून पैसे घेतल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे.
मनिषा पुकाळे असे निलंबित महिला पोलीस हवालदाराचे नाव आहे. पुकाळे फरासखाना पोलीस ठाण्यातील तपास पथकात नियुक्तीस आहेत. परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले यांनी शुक्रवारी रात्री वरील आदेश दिले आहेत.शहरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवरिुद्ध कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना दिले होते.
देशात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश वर्षभरापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले होते. त्यानंतर बांगलादेशी नागरिकांविरुद्ध कारवाई तीव्र करण्यात आली. बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत २०२३ मध्ये बांगलादेशी तरुणी दलालामार्फत आली होती. त्या वेळी ती अल्पवयीन होती.
वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी तरुणीने फरासखाना पोलीस ठाण्यात नुकतीच फिर्याद दिली होती.तिच्या फिर्यादीनुसार, दलाल, कुंटणखाना मालकासह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल करण्यापूर्वी बांगलादेशी तरुणी पोलीस हवालदार मनीषा पुकाळे यांनी भेटली होती. याबाबतची मााहिती पुकाळे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना देणे गरजेचे होते.
मात्र, पुकाळे यांनी वरिष्ठांना याबाबतची माहिती दिली नाही. त्यांनी तरुणीकडून पैसे घेतले होते. कायद्यानुसार बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी तक्रारदार बांगलादेशी तरुणीविरुद्ध कारवाई करणे गरजेचे होते. मात्र, पुकाळे यांनी ही बाब वरिष्ठापासून लपवून ठेवली होती.
बुधवार पेठेतील सामाजिक कार्यकर्त्यांनी ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर बांगलादेशी तरुणीची चौकशी करण्यात आली. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.





