Pune : गुन्हा, सत्ता, बदला… शहरातील आंदेकर टोळीचा चार दशकांचा रक्तरंजित प्रवास

पुणे – गुन्हा, सत्ता आणि बदला या सुत्राचा वापर करत गेल्या चार दशकांत आंदेकर टोळीने शहराच्या मध्यवर्ती भागात आपलं साम्राज्य उभारलं. भीती, दहशत, खून आणि राजकारणाचा मिलाफ हे साम्राज्याचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. चार दशके उलटली तरी आंदेकर टोळीचं नाव ऐकून पुण्याच्या अंगावर अजूनही काटा येतो.
पोलीस दलातील जुन्या – नव्या सूत्रांनी सांगितलेल्या माहितीनुसार १९७० च्या दशकात आंदेकर कुटुंबाचा व्यवसाय जुने कपडे घेऊन नवी भांडी देण्याचा होता. बाळकृष्ण उर्फ बाळू आंदेकर याने एका स्थानिक गुंडाचे बोट तोडले आणि येथूनच त्यांचा गुन्हेगारी प्रवास सुरू झाला.
- हप्ता वसुली, बेकायदा धंदे आणि मुंबईतील कुख्यात गुंडांशी असलेल्या संबंधामुळे त्याची ताकद वाढत गेली. १९७५ नंतर कसबा पेठेतील अप्पा तारू याच्याशी संघर्ष, आणि मग प्रमोद माळवदकरच्या सहभागामुळे टोळ्यांमध्ये संघर्ष उभा राहिला.
- १७ जुलै १९८४ रोजी शिवाजीनगर कोर्टात माळवदकरच्या टोळीने बाळू आंदेकरला ठार केलं. शहरभर दहशतीची लाट पसरली. याच घटनेपासून पुण्यातील टोळीयुद्धाला खरी सुरुवात झाली.
- बाळूच्या मृत्यूनंतर त्याचा भाऊ बंडू आंदेकर पुढे आला. तुरुंगवास, सुटका पुन्हा गुन्हेगारी आणि त्याचबरोबर राजकारणात प्रवेश करत बंडूच्या कारकिर्दीत आंदेकर टोळीने आपले पाय रोवले.
- १९९७ मध्ये प्रमोद माळवदकर पोलिस चकमकीत ठार झाला आणि आंदेकरांची दहशत पुन्हा बळावली.
आंदेकर कुटुंबाचे राजकारणात पाऊल
१९९० च्या दशकात आंदेकर कुटुंबाने राजकारणात पाऊल टाकलं. नगरसेवक, महापौर, निवडणुका या सगळ्यांमुळे सामाजिक वर्तुळात त्यांची पकड मजबूत झाली. असे असले तरी गुन्हेगारी धंदे थांबले नाहीत. गोळीबार, खंडणी, सावकारीमुळे पोलीस रेकॉर्डवर वारंवार नोंद झाली. यानंतर काळ बदलला, पण आंदेकर टोळीची ओळख तशीच राहिली.
माजी नगरसेवक वनराज आंदेकरचा खून
यातच २०२४ मध्ये माजी नगरसेवक वनराज आंदेकरचा खून झाला. पोलीस तपासात कौटुंबिक वादातून बहिणीचा नवरा गणेश कोमकर कट रचल्याचं उघड झालं. त्यानंतर ऐन गणेश विसर्जन मिरवणुकीच्या आदल्या दिवशी आयुष कोमकरचा दिवसाढवळ्या गोळ्या झाडून खून झाला. पुण्याचा दादा बंडू आंदेकर आणि कृष्णा आंदेकर अशी घोषणा देतच हल्लेखोरांनी रक्तरंजित संदेश दिला.
आंदेकर टोळी ही फक्त एक गुन्हेगारांची टोळी नाही, तर ती पुण्यातील गुन्हेगारी आणि राजकारणाच्या एकीकरणाचे प्रतीक आहे. साध्या भांड्यांच्या धंद्यातून सुरुवात करून खून, टोळीयुद्ध आणि सत्तेपर्यंत पोहोचलेली ही कहाणी आजही शहराला हादरवते.





