Pune Crime: धनकवडीतील वाहन तोडफोड गुन्ह्याची पोलिसांकडून 24 तासात उकल; दोघे जेरबंद

पुणे – धनकवडी परिसरात नागरिकांच्या वाहनांची तोडफोड करून दहशत माजवणाऱ्या टोळीचा छडा सहकारनगर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन तरुण आरोपींसह तीन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे. आरोपी आखाड पार्टी करून वाढदिवस असलेल्या अल्पवयीन मुलाला भेटण्यास त्या परिसरात आले होते. मात्र, मित्राने भेटण्यास नकार दिल्याने आरोपींनी रागाने हे कृत्य केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.
“आम्ही धनकवडीचे भाई आहोत, आमच्या नादाला लागायचं नाही” असे आरडा-ओरड करत २३ जुलै रोजी मध्यरात्री सुमारे १२.३० वाजता १५ रिक्षा, दोन कार आणि एका व्हॅनची तोडफोड करण्यात आली होती. तपास करत असताना पोलीस अंमलदार अमोल पवार यांना माहिती मिळाली की, हा गुन्हा सहकारनगर पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार रोहित कैलास आढाव (२१, रा. किरकटवाडी) याने त्याच्या साथीदारांसह केला आहे. त्यानुसार पोलिसांनी नवले ब्रिज परिसरात सापळा रचून आणि आढाव आणि सुधीर बाप्पू सावंत (१९, रा. गोरावी वस्ती, नांदेड फाटा) यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि गुन्ह्यात तीन अल्पवयीनांचा समावेश असल्याचेही सांगितले. पोलिसांनी गुन्ह्यातील एक दुचाकी जप्त केली.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त (पश्चिम) राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त (परिमंडळ-२) मिलींद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त (स्वारगेट) राहुल आवारे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपास पथकात सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील, उपनिरीक्षक बापू खुटवड, अंमलदार अमोल पवार, किरण कांबळे, प्रदीप रेणुसे, अमित पदमाळे, महेश भगत आदींचा समावेश आहे.





