पुणे- पुणे शहरातील खराडी परिसरातील मॅग्नेटल बीपीएस अँड कन्सलटन्सी एलएलपी या कॉल सेंटरवर पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत सायबर फसवणुकीचे रॅकेट उघडकीस आणले आहे. या कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांना ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून आर्थिक लूट केली जात होती. पोलिसांनी या प्रकरणी ५ जणांना अटक केली असून ११५ जणांना ताब्यात घेतले आहे. मात्र, या रॅकेटचे तीन मुख्य सूत्रधार फरार झाले आहेत. अमेरिकन गुप्तचर विभागाच्या सूचनेनंतर भारतीय गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. अटक आरोपींची नावे – अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सरजितसिंग गिरावत शेखावत (झुंझुणा, राजस्थान), अभिषेक अजयकुमार पांडे, श्रीमय परेश शहा, लक्ष्मण अमरसिंग शेखावत आणि ॲरोन अरुण खिश्चन (सर्व रा. अहमदाबाद, गुजरात) यांचा समावेश आहे. पोलिसांनी येथून ९ लाख ६० हजार रुपये किमतीचे ६४ लॅपटॉप, ४ लाख १० हजार रुपये किमतीचे ४१ मोबाईल, राउटर आणि लाखो अमेरिकन नागरिकांचा डेटा जप्त केला आहे. या कारवाईत २० अधिकारी आणि १५० पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. १० हजार चौरस फुटांचे कॉल सेंटर – खराडीतील आयटी हबमध्ये १० हजार चौरस फुट जागा भाड्याने घेऊन हे कॉल सेंटर जुलै २०२४ मध्ये सुरू करण्यात आले होते. येथे ८ मुख्य आरोपींसह १२३ कर्मचारी कार्यरत होते, ज्यामध्ये १२ महिलांचा समावेश होता. हे कॉल सेंटर अमेरिकन वेळेनुसार सायंकाळी ६ ते पहाटे २ या वेळेत कार्यरत होते. कर्मचाऱ्यांना दररोज १ लाख अमेरिकन नागरिकांचा डेटा पुरवला जात होता. कर्मचारी संबंधित व्यक्तींचे प्रोफाइल तपासून त्यांना कॉल करत आणि ‘तुमच्या पार्सलमध्ये अमली पदार्थ सापडले आहेत’ किंवा ‘तुमच्या बँक खात्याचा वापर देशविघातक कारवायांसाठी झाला आहे’ अशी भीती दाखवून त्यांना अटकेची धमकी देत होते. यानंतर त्यांच्याकडून क्रिप्टो करन्सी किंवा ॲमेझॉन व्हाउचर्सच्या स्वरूपात पैसे उकळले जात होते. ही रक्कम परदेशात स्थानिक चलनात रूपांतरित करून आंतरराष्ट्रीय हवाला मार्गाने भारतात आणली जात होती. या रॅकेटद्वारे दररोज २० ते ३० हजार अमेरिकन डॉलर्सची फसवणूक केली जात होती. इंग्रजी स्क्रिप्टद्वारे फसवणूक – कर्मचाऱ्यांना इंग्रजीत तयार केलेले फसवणुकीचे स्क्रिप्ट देण्यात येत होते, ज्याच्या आधारे ते अमेरिकन नागरिकांना जाळ्यात अडकवत होते. भारतात अनेक मोठ्या कंपन्यांचे कॉल सेंटर्स (बीपीओ) असल्याने अमेरिकन नागरिकांना भारतीय लहेजातील इंग्रजी बोलण्याची सवय आहे. यामुळे कॉल सेंटरमधून येणाऱ्या कॉल्सवर त्यांना संशय येत नसे. पोलिसांनी ही स्क्रिप्ट्सही जप्त केली आहेत. पोलिसांची मोठी कारवाई – ही कारवाई पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार, उपायुक्त (गुन्हे) निखील पिंगळे, उपायुक्त (आर्थिक व सायबर) विवेक मासाळ, सहायक आयुक्त गणेश इंगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (सायबर) स्वप्नाली शिंदे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शब्बर सय्यद, अजय वाघमारे, प्रताप मानकर, वाहीद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. याशिवाय सहायक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर, पोलीस उपनिरीक्षक तुषार भोसले, संतोष तानवडे, राम दळवी, वैभव मगदुम, सहायक पोलीस फौजदार कैलास चव्हाण, अविनाश इंगळे, पोलीस अंमलदार होले, वाघमारे, विजय पवार, बाळासाहेब सकटे, निलेश जाधव, हरीष मोरे, विशाल इथापे, देविदास वांढरे, अमित जमदाडे, ऋषिकेश व्यवहारे, निखील जाधव, महिला पोलीस अंमलदार सीमा सुडीत, स्मिता हंबीर, जान्हवी मडेकर, तसेच संदीप पवार, मांढरे, दिनेश मरकड, सचिन शिंदे, प्रवीण राजपूत यांनी या कारवाईत सहभाग घेतला. फरार आरोपींचा शोध सुरू – या रॅकेटचे तीन मुख्य सूत्रधार फरार असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास तीव्र केला आहे. सायबर फसवणुकीच्या या प्रकरणाने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुन्हेगारीच्या गंभीर स्वरूपावर प्रकाश टाकला आहे.