Pune Crime | पोलिसांची गांजा तस्करांवर छापा! 12 किलो गांजासह 5 लाखांचा मुद्देमाल जप्त, एक अटकेत

प्रभात वृत्तसेवा
लोणी काळभोर – दौंड तालुक्यातून गांजा घेऊन निगडी येथे विक्री करण्यासाठी चाललेली रिक्षा लोणी काळभोर पोलिसांनी थेऊर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील थेऊर रेल्वे पूल सेवा रस्त्यावर आज सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास पकडली आहे.या रिक्षात पोलिसांना सुमारे 12 किलो 345 ग्रॅम गांजा सापडला आहे. पोलिसांनी या कारवाईत रिक्षासह 5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एका तस्कराला पोलिसांनी अटक केली आहे.
लक्ष्मण राजू पवार (वय.30, रा. यमुनानगर, ओटा स्किम निगडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या तस्कराचे नाव आहे. तर रवि आण्णा कुर्हाडे ( यमुनानगर, ओटा स्किम निगडी, पुणे), चंद्रकांत सुरेश पवार (वय 28, रा. बोरीऐंदी, ता. दौंड) व एक अनोळखी इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार राहुल कर्डिले यांनी सरकारच्या वतीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लोणी काळभोर पोलीस गस्त घालत होते.
गस्त घालत असताना, राहुल कर्डिले यांना थेऊर रेल्वे पुलाच्या जवळ असलेल्या सेवा रस्त्यावरून गांजाची तस्करी होणार आहे अशी माहिती एका खबर्यामार्फत मिळाली होती. तेथे सापळा रचला तेव्हा ज्ञानेश्वर आंदेकर यांच्या शेतजमीनी लगत पोलिसांनी एक संशयास्पद रिक्षा पकडला. तेव्हा रिक्षामध्ये लक्ष्मण पवार हा आढळून आला. पोलिसांनी त्याच्याजवळ असलेल्या गोणीची झडती घेतली असता. त्यामध्ये सुमारे 2 लाख 50 हजार रुपयांचा गांजा आढळून आला. रवि आण्णा कुर्हाडे हा सुद्धा रिक्षात बसलेला होता.
मात्र त्याला पोलीस आल्याची चाहूल लागताच, तो रिक्षातून उडी मारून पसार झाला. पोलिसांनी लक्ष्मण पवार याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, 12 किलो 345 ग्रॅम गांजा हा चंद्रकांत सुरेश पवार व त्याच्या सोबत मोटारसायकलवरील अनोळखी इसम यांच्याकडून घेऊन विक्रीसाठी चालविला असल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी या कारवाईत 5 लाखांचा मुद्देमाल जप्त करून लक्ष्मण पवार याला गुन्हा दाखल करून अटक केली आहे. तर उर्वरित आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचे एक पथक मागावर आहे.





