Pune Crime : बोपदेव घाटात पोलिसांना धक्काबुक्की; महिलेसह दोघांना अटक
Updated On:

पुणे – बोपदेव घाटात गस्त घालणाऱ्या पोलिसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी दुचाकीस्वारासह एका महिलेला पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी गौरव निवृत्ती पवार (वय ३३, रा.पाटीलनगर, येवलेवाडी) याच्यासह एका महिलेला अटक करण्यात आली.
याबाबत पोलीस कर्मचारी संदीप जाधव यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बोपदेव घाटात लुटमारीचे प्रकार घडत असल्याने या भागात पोलिसांकडून नियमित गस्त घालण्यात येते. बोपदेव घाटातील रोशनी हॉटेलजवळ दुचाकीस्वार पवार आणि त्याच्याबरोबर एक महिला थांबली होती.
पोलिसांनी त्यांची चौकशी केली. तेव्हा पवार आणि महिलेने पोलिसांबरोबर अरेरावी करून धक्काबुक्की केली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून सहाय्यक निरीक्षक स्वराज पाटील तपास करत आहेत.





