Pune Crime: पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून केला पर्दाफाश, “स्पा’च्या नावाखाली सुरु होता वेश्या व्यवसाय, व्यवस्थापकाला ठोकल्या बेड्या

पुणे – विमानगर भागात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. या कारवाईत मसाज सेंटरच्या व्यवस्थापकाला अटक करण्यात आली असून वेश्याव्यवसाय करणाऱ्या तीन तरुणींना ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणी मसाज सेंटरचा व्यवस्थापक इमदादुला इस्माईल अली याला अटक केली आहे. मसाज सेंटरचा मालक शंतनू सरकार, शमशुद्दीन, जयराम वॅलपुली यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विमाननगरमधील गल्ली क्रमांक तीन मध्ये एका बंगल्यात अमेया स्पा नावाने मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागातील पोलिस निरीक्षक राजेश पुराणिक यांना मिळाली.
पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून शहानिशा केली. त्यानंतर तेथे छापा टाकण्यात आला. मसाज सेंटरमधील व्यवस्थापक इमदादुला अलीला ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत तीन तरुणींना ताब्यात घेण्यात आले असून नऊ हजारांची रोकड जप्त करण्यात आली. आरोपीं विरोधात विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक, उपनिरीक्षक सुप्रिया पंढरकर, मोहिते, अश्विनी केकाण, हनुमंत कांबळे, आण्णा माने यांनी ही कारवाई केली.





