Pune Crime: येरवडा कारागृहातून बाहेर सुटताच मोक्काच्या गुन्हेगाराची काढली रॅली; व्हिडीओ व्हायरल

पुणे – येरवडा कारागृहातून मोक्काच्या गुन्हयातून बाहेर सुटताच गुन्हेगाराची चारचाकी आणि दुचाकीवरुन रॅली काढण्यात आली. याप्रकरणाने खळबळ माजली असून प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. या रॅली काढणाऱ्या गुन्हेगारासह त्याच्या तब्बल ५० साथीदारांवर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या रॅलीचे व्हिडिओ समाजमाध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.
प्रफुल्ल उर्फ गुड्या कसबे ( रा. लक्ष्मी नगर येरवडा पुणे, दीपक मदने, करण सोनवणे, अनिकेत कसबे, अंश पुंडे, अजय कसबे, सागर कसबे, अभिजीत ढवळे, राहुल रसाळ, नन्या कांबळे, रोशन पाटील, तुषार पेठे, व इतर ३५ ते ४० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई लहू एकनाथ गडमवाड यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना मंगळवारी रात्री दहा ते साडेदहाच्या सुमारास घडली.
Pune Crime: येरवडा कारागृहातून बाहेर सुटताच मोक्काच्या गुन्हेगाराची काढली रॅली; व्हिडीओ व्हायरल pic.twitter.com/9VUdLAq3lR
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) January 9, 2025
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, प्रफुल्ल उर्फ गुड्या कसबे याच्यावर मोक्काचा गुन्हा दाखल आहे. तो या गुन्हयातून मंगळवारी सायंकाळी जामिनावर सुटला. जामिनावर सुटल्यानंतर त्याच्या साथीदारांनी चार चारचाकी आणि २० ते ३० दुचाकीवरुन त्याची रॅली काढली.
यामध्ये ४० ते ५० जण सहभागी झाले होते. या रॅलीचे काहींनी स्टेटसही ठेवले होते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर खळबळ माजली होती. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेत गुन्हा दाखल केला. मात्र तोवर कसबे हा फरार झाला. दरम्यान कसबे हा जामिनावर सुटल्यावर येरवडा पोलीस ठाण्यात हजेरी लावण्यात आला होता. मात्र त्याच वेळेत एका कॉल सेंटरमधील तरुणीच्या खूनाची घटना घडली होती. यामुळे पोलीस ठाण्यातील बहुतांश स्टाफ आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी होते. यामुळे कसबे पोलीस ठाण्यातून बाहेर पडला आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी त्याची रॅली काढली.
या टोळीतील बुहतेक गुन्हेगारावर मोक्काच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात आहे. काही महिण्यापुर्वीच त्यांच्या टोळीतील एका सदस्याचा वाढदिवस होता. तेव्हा त्याच्या टोळीतील बाहेर असलेल्या सदस्यांनी येरवडा कारागृहाबाहेर मोठी आतषबाजी करुन वाढदिवस साजरा केला होता. तेव्हाही गुन्हा दाखल करण्यात आला होता.





