Pune Crime: अवैध बांधकामाचा ‘मास्टरमाइंड’ अटकेत: एकच फ्लॅट अनेकांना विकणाऱ्या बिल्डरवर कारवाई

पुणे – सातत्याने कारवाई करूनही अवैध बांधकाम करण्याबरोबरच एकच फ्लॅट अनेकांना विक्री करणे, मुदतीत फ्लॅटचा ताबा न देणार्या बांधकाम व्यावसायिकाला कोंढवा पोलिसांनी अटक केली. नवनाथ महादेव माने (४५, रा. गंजपेठ, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माने याने कोंढवा भागातील मलिकनगर, साईबाबानगर, भाग्योदयनगर, मिठानगर, शिवनेरीनगर या भागात महापालिकेची परवानगी न घेता अवैध बांधकामे केली. त्याच्याविरुद्ध महापालिकेने अनेक वेळा गुन्हे दाखल केले आहेत. तरीही माने याने परत अवैध बांधकाम चालू केल्याने पुणे महापालिकेचे अभियंता यांच्या तक्रारीवरून कोंढवा पोलिसांनी माने याच्यावर महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला होता.
आरोपी माने याने अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने अर्ज फेटाळला. माने याने साईबाबानगर येथील इमारत पाडताना कोणत्याही प्रकारे स्थानिक नागरिकांच्या सुरक्षितेबाबत उपाय योजना केल्या नाहीत. तसेच कोंढवा भागात एक फ्लॅट अनेक लोकांना विक्री करणे, ठरलेल्या मुदतीत फ्लॅटचा ताबा न देता दमदाटी करणे अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यावरून जून्या गुन्ह्यात कलमवाढ करण्यात आली. यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेऊन मानेला अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक मयुर वैरागकर पुढील तपास करीत आहेत.





