Pune Crime: “मंत्राद्वारे तुला बकरी बनवेल” – धमकी देत मांत्रिकाकडून विधवा महिलेची 2.60 लाखांची फसवणूक

पुणे – पुण्यातील उच्चभ्रू कोरेगाव पार्क भागात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्वतःला तांत्रिक असल्याचे भासवून एकाने विधवा महिलेची २ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी मोहम्मद खांसाहिब जान मदारी या व्यक्तीला अटक केली आहे. त्याने ही घटना कोणास सांगितल्यास महिलेला मंत्राद्वारे तुला बकरी बनवेल, अशी धमकी दिली होती.
फिर्यादी महिला कोथरूड परिसरातील असून, ती दोन मुलांची आई आहे. आर्थिक अडचणींमुळे मदतीच्या शोधात असताना, एका ओळखीच्या महिलेमार्फत तिचा परिचय मदारीशी झाला. मदारीने तिला सांगितले की, तो तांत्रिक उपायांनी सोन्याचा हंडा तिच्यासाठी आणणार असून, त्यामुळे तिचे आर्थिक भाग्य पालटेल.
यासाठी त्याने महिलेला विशिष्ट पूजा करण्यास सांगितले आणि त्या बदल्यात २ लाख ६० हजार रुपये घेतले. त्यानंतर मदारीने पूजा करून एक काळ्या कपड्यात गुंडाळलेला माठ तिला दिला व तिला १७ दिवसांनी रात्री ११ वाजून २१ मिनिटांनी तो उघडण्यास सांगितले. महिलेने सांगितलेल्या वेळेनुसार माठ उघडला असता, त्यात केवळ माती आढळली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने मदारीशी संपर्क साधला. मदारीने तिला १६ जुलैला सायंकाळी घरी बोलावले.
पोलिसांनी आधीच सापळा रचून ठेवलेला असल्याने, त्याच ठिकाणी मदारीला अटक करण्यात आली. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील थोपटे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), संगीता जाधव, सहायक पोलीस निरीक्षक शिल्पा निमकर, पोलीस हवालदार प्रवीण पडवळ, मयूर शिंदे आणि विवेक जाधव यांच्या पथकाने केली. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१६(२) आणि अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा प्रतिबंधक कायदा कलम ३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर १९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे





